निर्भयाची आई दिल्ली निवडणूक लढविणार?


दिल्ली विधानसभेच्या निवडणुकासाठी ८ फेब्रुवारीला मतदान घेतले जात असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्व पक्ष हमखास विजयी होऊ शकतील अश्या उमेदवारांचा शोध घेऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आमआदमी पक्षाने निर्भयाच्या आईला उमेदवारी देण्याची तयारी दाखविली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

१६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या निर्भया गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना येत्या २२ जानेवारीला सकाळी सात वाजता तिहार जेल मध्ये एकच वेळी फासावर चढविले जाणार आहे. देशभरात गाजलेल्या या प्रकरणात आरोपींना शिक्षा सुनावल्यावर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया बहुतेक सर्व वर्तमानपत्रातून प्रसिध्द झाली. त्यामुळे त्यांना राजकारणात आणण्याची तयारी सुरु असून वरील दोन पक्ष त्यांना विधानसभेसाठी तिकीट देऊ इच्छित असल्याचे सांगितले जात आहे. निर्भयाच्या आईने खरेच ही निवडणूक लढविली तर त्या विजयी होण्याची शक्यता मोठी आहेच पण अन्य काही जागांवरही त्यामुळे प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या संदर्भात निर्भयाच्या आईने माझ्या मुलीच्या गुन्हेगारांना प्रथम फासावर लटकलेले पाहण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या अजून कोणत्याच पक्षाने मला निवडणुकीसंदर्भात संपर्क केलेला नाही. मात्र या गुन्हेगारांना फाशी व्हावी मग कदाचित मी राजकारणाचा विचार करू शकेन. तज्ञांच्या मते निर्भयाच्या आईने निवडणूक लढविण्याचा विचार केला तर त्यांचा विजय निश्चित आहे.

Leave a Comment