ड्रोन मालकांना ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार


केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन मालक किंवा ड्रोन उडविणारे या सर्वाना ३१ जानेवारी पर्यंत ड्रोन नोंदणी करण्याचे आदेश जारी केले असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड विधानानुसार कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला करून इराणच्या लष्करी कमांडर सुलेमानी याला ठार केल्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. त्यासाठीची सार्वजनिक नोटीस जारी केली गेली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिकारी या संदर्भात म्हणाले, काही ड्रोन मालकांनी नागरी हवाई उड्डाण रिक्वायरमेंट मानके पूर्ण केलेली नाहीत. सिव्हील ड्रोन संचालकांची ओळख पटावी यासाठी त्यांना स्वेच्छेने त्यासंदर्भातील घोषणा करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार ड्रोन मालकांनी ३१ जानेवरी २०२० पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

ड्रोनसाठी नागरी उड्डाण महानिदेशालयाने ऑगस्ट २०१८ मध्येच सीएआर लागू केला आहे. त्याअंतर्गत ड्रोन मालकांनी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना परमीट आणि अन्य मंजुऱ्या घ्याव्या लागणार आहेत. विना परवानगी ड्रोन उडविणे बेकायदेशीर असून ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यावर मालकांना दोन युनिक नंबर दिले जातील. त्यात ड्रोन उडविणे आणि ड्रोन बाळगणे यांचा समावेश आहे.

Leave a Comment