…तर शिवरायांच्या वंशजांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत


मुंबई – आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात आज घेतलेल्या प्रत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही नरेंद्र मोदींचा आदर करतो. पण कितीही मोठा नेता असला तर त्यांची तुलना छत्रपतींशी करणे चुकीचे आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज दैवत असल्यामुळे त्या पुस्तकाचा आम्ही निषेध करतो. तसेच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आणि छत्रपतींच्या वंशजांनी तत्काळ प्रतिक्रिया द्याव्यात, अशी मागणी शिवसेना केली आहे. त्याचबरोबर शिवरायांचे वंशज म्हणून अशा प्रकारानंतर त्यांना जाब विचारत आपल्या पदांचा राजीनामा द्यायला हवा, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी हे मोदी आहेत. पण, सगळ्यांच्या वर छत्रपती शिवाजी आहेत. मोदी कधी विष्णूंचा अवतार असतात. तर कधी शिवराय होतात. कदाचित हे भाजपच्या लोकांना मान्य असेल. पण, आमचे शिवराय दैवत आहेत. त्यांच्याशी तुलना आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे आज के शिवाजी या पुस्तकावर मोदींसह भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांना हे मान्य आहे का ते त्यांनी जनतेपुढे सांगावे, ही आमची भूमिका असल्याचे मत संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या ट्विटलाही राऊत यांनी उत्तर दिले. कोणत्या नेत्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली तर शिवरायांचे वंशज म्हणून प्रथम त्यांनी याबाबत जाब विचारायला हवा होता. त्यामुळे मोदींची तुलना मी छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे वंशजांना मान्य आहे का? असा सवाल केला. यावर त्रागा करण्यासारखे काय आहे, असा सवाल त्यांनी केला. याचे उत्तर जनतेलाही हवे आहे. या शिवाय त्यांनी सर्वात आधी शिवरायांचे वंशज म्हणून तुमच्या पदाचे राजीनामे द्यायला हवेत, असेही राऊत म्हणाले.

मी शिवरायांच्या वंशजांना प्रश्न विचारल्याबाबत आमच्या पक्ष नेतृत्वाशी मी चर्चाही केली आहे. आपली भूमिका योग्य असल्याचेच त्यांनी म्हटले आहे. शिवरायही आपली अस्मिता आहे. एखाद्या राजकीय नेत्याशी त्यांची तुलना म्हणजे महाराष्ट्रासह मराठी जनतेचा अपमान असल्याचे उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजप नेते आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर आज त्यांची भूमिका मांडतील, अशी आशा आहे. सावरकरांवर जर तत्काळ प्रतिक्रिया दिली जाते तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या प्रश्नावर ही ती आलीच पाहिजे. त्यामुळे भाजपने हे पुस्तक मागे घेऊन या पुस्तकावर बंदी घालून याच्याशी संबंध नसल्याचे सांगावे. असे म्हणत राऊतांनी मागच्या पाच वर्षात शिवरायांच्या आशीर्वादाने सत्ता चालवणाऱ्या भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्र सदनावर ज्या व्यक्तीने हल्ला केला. मी माझ्या वतीने त्याला आव्हान देऊन, त्याच्या घरावर माणसे पाठवून त्याला पळवून लावले होते. अशा व्यक्तीकडून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान होत असेल तर लवकरात भाजपने प्रतिक्रिया द्यायला हवी. या राज्यात ते राज्यकर्ते होते. शिवरायांचे स्मारक बांधणार होते. बर झाले त्यांनी स्मारक बांधले नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Leave a Comment