पठाणकोटमध्ये लागले खासदार सनी देओल हरवल्याचे पोस्टर


नवी दिल्ली – आमचा खासदार सनी देओल हरवला आहे, अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध सिनेअभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या विरोधात पठाणकोटमध्ये लागले आहेत. सनी देओल यांनी गुरुदासपूरमध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर एकदाही मतदारसंघाचा दौरा केला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

अज्ञातांनी सनी देओल यांना लक्ष करणारे पोस्टर्स ठिकठिकाणी लावले आहेत. या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आमचे खासदार सनी देओल हरवले असून त्यांना शोध सुरू आहे, अशा आशयाची ही पोस्टर्स रेल्वेस्टेशन पासून तर चौकाचौकात लावली आहेत. बऱ्याच दिवसांपासून आमच्या भागात सनी देओल फिरकले नाहीत. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना खासदारकीची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे.

पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर यांच्याविरोधात देओल यांनी ही निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच ८० हजार मतांनी पराभव केला होता. यापूर्वी गुरुदासपूर येथून भाजपचे उमेदवार अभिनेते-राजकारणी विनोद खन्ना खासदार होते. पण, त्यांच्या निधनानंतर या जागेसाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो त्यांना सनी देओल यांच्या रुपाने मिळाला.

Leave a Comment