‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाशी पक्षाचा संबंध नाही – भाजप


नवी दिल्ली – भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले नाही. भाजपचा या पुस्तकाशी कोणताही संबंध नाही. भाजपचा या पुस्तकाशी आणि पुस्तकात व्यक्त झालेल्या मतांशीही कोणताही संबंध नसल्याचे म्हणत भाजपने पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर हे पुस्तक परत घ्यायचे असेल तर, त्याबाबत पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक निर्णय घेतील, असेही भाजपच्या नेत्यांनी दिल्ली येथील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

असे असले तरी भाजप कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. याबाबत अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया आली नाही. दुसरीकडे पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी मी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक आपण परत घेऊ असे म्हटले आहे.

जय भगवान गोयल यांनी पुस्तक आणि त्याच्या शिर्षकावरुन निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना पुढे म्हटले आहे की, पुस्तक लिहिताना माझा कोणताही विचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याचा नव्हता. जसे काम छत्रपती शिवाजी महाराज हे करायचे तसेच, पंतप्रधान मोदीही काम करत, असल्याचे मला वाटते. त्यामुळे आपण पुस्तकावर तसा शिर्षकात उल्लेख केला. पण, यामागे कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे गोयल यांनी म्हटले आहे.

आपल्या राज्यातील महिला, मुली आणि जनतेची छत्रपती शिवाजी महाराज यांनी काळजी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याचप्रमाणे आपल्या जनतेची काळजी घेत आहेत. प्रत्येक महिलेला या सरकारच्या काळात आपण सक्षम असल्याचे वाटत आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment