कोणत्याही राजकारण्याची शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही


बुलडाणा – शनिवार दिल्लीत ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. नरेंद्र मोदींची तुलना यामध्ये थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. भाजपवर यावरुन जोरदार टीका होताना दिसत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजेंनीही या पुस्तकाच्या मुद्यावरुन टीका केली आहे. मोदीच काय तर कोणत्याही राजकारण्याची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी या पुस्तकावर टीका केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या पुस्तकावर बंदी आणावी, असे आवाहनही संभाजीराजेंनी यावेळी केले. हे पुस्तक जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने लिहिले असून, त्यांनी ट्विट करून पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती दिली. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

Leave a Comment