नरेंद्र मोदी आणि योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा दिल्या तर जिवंत गाडू


लखनऊ- उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्र्याने अलीगडमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थानात झालेल्या रॅलीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात कोणी घोषणा दिल्यातर त्यांना जमिनीत जिवंत गाडू, असे वादग्रस्त वक्तव्य योगी सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी केले आहे.

त्यांचा या विधानावरुन इशारा अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या विरोध प्रदर्शनाकडे होता. आपल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या. रघुराज म्हणाले की, नागरिकत्व कायद्याचा फक्त 1 टक्का लोक विरोध करत आहेत. भारतात हे लोक राहतात, आपल्या करदात्यांचे खातात आणि आपल्याविरोधातच घोषणा देतात. हा सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे, पण आमच्या नेत्यांविरोधात बोलल्यावर आम्ही सहन करणार नाहीत.

आम्हीदेखील उत्तर प्रदेशप्रमाणे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना गोळी मारू, असे विधान पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी केली. ते पुढे म्हणाले की, अशा लोकांना उत्तर प्रदेशच्या सरकारने फक्त ताब्यात घेतले नाही तर त्यांच्यावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला. नागरिकत्व कायद्याच्या समर्थानासाठी झालेल्या एका कार्यक्रमात खडगपूरचे खासदार दिलीप घोष बोलत होते. त्यांनी यावेळी ममता बॅनर्जींवर सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहचवणाऱ्यांवर काहीच कारवाई न करण्याचा आरोप लावला आहे. घोष पुढे म्हणाले की, सार्वजनिक संपत्तीला ते लोक नुकसान पोहचवत आहेत. ही संपत्ती त्यांच्या बापाची आहे का? सार्वजनिक संपत्ती करदात्यांची आहे. याबाबत ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत. आसाम आणि उत्तर प्रदेशमधील आमच्या सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई केली.

Leave a Comment