जेएनयू भेटप्रकरणी जाहिरातींच्या ब्रॅण्डने दीपिकापासून चार हात लांब राहणे केले पसंत


अभिनेत्री दीपिका पादुकोणकडे जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. पण अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्डने सध्या तिच्यापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. दीपिकाने अलिकडेच जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्रदेखील डागले. त्याचबरोबर काहींनी तिच्या ‘छपाक’चाही विरोध करण्यास सुरुवात केली. अनेक कंपन्या तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादामुळेच सतर्क झाल्या असून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार दीपिका ज्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. त्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती दाखविण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्याचबरोबर आगामी काळात कलाकारांसोबत कोणताही करार करताना त्यामध्ये एक नवा क्लॉज तयार करण्यात येणार आहे. कोणतीही कंपनी सामान्यपणे त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर रहावी याचा विचार करत असल्यामुळे आपल्या कंपनीला कोणत्याही वादाचा फटका बसू नये यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते, असे कोका-कोला आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितले आहे.

आपल्या जाहिरातीत दीपिका असल्यामुळे एका ब्रॅण्डने ही जाहिरात जवळपास २ आठवडे दाखवू नये, असे सांगितले आहे. त्याचबरोबर दीपिका जेएनयूमध्ये गेल्यानंतर, जो वाद निर्माण झाला आहे. तो वाद शमल्यानंतर ही जाहिरात परत दाखवा, असे एका कंपनीने आम्हाला सांगितल्याचे मीडिया बाइंग एजन्सीने सांगितले आहे.

दीपिका ब्रिटानिया गुड्डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स,अॅक्सिस बॅकसह अन्य २३ ब्रॅण्डसाठी जाहिराती करते. दीपिकाचे त्यामुळे नेटवर्थ १०३ कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटासाठी १० कोटी आणि जाहिरातींसाठी ८ कोटी रुपये मानधन दीपिका आकारते.

Leave a Comment