काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी ड्रेस कोड लागू


वाराणसी : आता ड्रेस कोड वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी लागू करण्यात आला आहे. बाबा विश्वनाथ यांचे विशेष कपड्यांमध्येच दर्शन घेता येणार आहे. पण केवळ स्पर्श दर्शन करणाऱ्या भक्तांसाठीच हा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. स्पर्श दर्शन न करणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड आवश्यक नसणार आहे.

या नव्या नियमानुसार, काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करणाऱ्या महिलांसाठी साडी हा ड्रेस कोड असणार आहे. तर पुरुषांसाठी धोती-कुर्ता घालणे अनिवार्य असेल. हा निर्णय रविवारी रात्री, काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, भक्त सकाळी ११ वाजेपर्यंत काशी विश्वनाथाचे स्पर्श दर्शन करु शकणार आहेत. पॅन्ट, शर्ट, जीन्स असे कपडे घातलेले भक्त दुरुनच दर्शन घेऊ शकतात. हा नवा ड्रेस कोड कधीपासून सुरु करण्यात येणार याबाबत सांगण्यात आले नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नियम लवकरच लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, हा नियम उज्जैनच्या महाकाल मंदिरातही लागू आहे. याच धर्तीवर काशी विश्वनाथ मंदिरातही ड्रेस कोडनुसारच, स्पर्श दर्शन करण्यासाठी अनुमती दिली जाणार आहे.

Leave a Comment