व्हीआयपी सुरक्षेतून एनएसजी कमांडो मुक्त होणार


देशातील व्हीआयपीसाठी पुरविले जाणारे एनएसजी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड कव्हर हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे अश्या सुरक्षा सेवेत अडकून पडलेले ४५० कमांडो या कामातून मुक्त होऊ शकणार आहेत आणि त्यांना ज्या कामासाठी प्रशिक्षित केले जाते त्या कारवाईसाठी उपलब्ध राहू शकणार आहेत.

गांधी परिवारचे एनएसजी कमांडो सुरक्षा कव्हर नुकतेच हटविले गेले तेव्हा त्यावर वादंग माजले होते. तेव्हाच सर्वच व्हीआयपी साठी हाच नियम लागू केला असल्याचे सांगितले गेले. गेल्या दोन दशकानंतर दहशतवाद विरोधी विशिष्ट दलाचे ब्लॅक कमांडो आता व्हीआयपी ना सुरक्षा देणार नाहीत. एनएसजीची स्थापना १९८४ मध्ये झाली असून त्यामध्ये व्हीआयपी सुरक्षा पुरविणे हा उद्देश कधीच नव्हता. एनएसजी सध्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या १३ हाय प्रोफाईल व्हीआयपीनं सुरक्षा पुरवीत आहेत. त्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मायावती, मुलायमसिंग यादव, चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, फारुख अब्दुल्ला, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा समावेश आहे.

अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असलेले हे कमांडो प्रामुख्याने दहशतवादी मुकाबला, विमान अपहरण अश्या अतिशय अवघड कामात सहाय्य करण्यासाठी प्रशिक्षित केले गेलेले असतात. व्हीआयपीना सुरक्षा देताना प्रत्येक व्हीआयपी मागे असे किमान २४ कमांडो त्याकामी अडकून पडतात. परिणामी त्यांच्यावरील कामाचे ओझे वाढते. त्यामुळे आता यापुढे व्हीआयपी सुरक्षेचे काम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे सोपविले जाणार आहे.

Leave a Comment