या पार्कमध्ये आहे सैतानाचा पूल


फोटो एलाईट रीडर्स सौजन्याने
जगभर अनेक रहस्यमय आणि अनोख्या जागा आहेत. जर्मनीतील क्रोमलाऊ पार्क त्यातील एक म्हणता येईल. या पार्क मध्ये आहे एक पूल ज्याला सैतानाचा पूल म्हटले जाते. हा पूल अर्धगोलाकार, महिरपीच्या आकाराचा असून पूर्व जर्मनीमधील पार्क मध्ये आहे. पूल आहे म्हणजे त्याखाली जलाशय आहे. या जलाशयाचे पाणी अगदी शांत असेल म्हणजे त्यात लहरी नसतील तेव्हा या पुलाचे स्पष्ट प्रतिबिंब पाण्यात उमटते आणि एक पूर्ण गोलाकृती अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. अश्या वेळी सूर्याची किरणे चमकत असतील तर हा देखावा परिकथेतला होऊन जातो.


हा पूल कसा बनला त्याच्या अनेक कथा सांगतात. पैकी एक, एका बिल्डरने तो सैतानाच्या मदतीने बांधला. पूल बांधण्यासाठी मदत करताना सैतानाने एक अट ठेवली आणि ती अशी होती की पुल तयार झाल्यावर जो कुणी त्यावरून प्रथम जाईल त्याला सैतान खाणार. पूल तयार झाला पण बिल्डरने सैतानाला चुना लावला, म्हणजे त्याने प्रथम एक प्राणी पुलावरून पाठवायचे ठरविले. पण सैतान काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने बिल्डरवर अशी वेळ आणली की बिल्डरला स्वतःलाच त्या पुलावरून जाणे भाग पडले.

युरोप मध्ये असे अनेक पूल आहेत जे सैतानी पूल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातील बहुतेक सर्व मध्ययुगात म्हणजे १००० ते १६०० या काळात बांधले गेले आहेत. क्रोमलाऊ पार्क मधील पूल १८६० मध्ये बांधला गेला असून या पुलाला जर्मन भाषेत राकोत्स्बुक असे म्हणतात. हे पार्क २०० एकर परिसरात असून हे एक सुंदर जंगल आहे. पोलंड सीमेजवळ हे पार्क आहे.

Leave a Comment