आयुर्वेदिक आहारपद्धती म्हणजे नक्की काय?


आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हा फारच क्लिष्ट प्रकार आहे अशी काहींची समजूत असेल. पण वास्तवात मात्र ही आहाराची पद्धत अश्या काही चालीरीतींवर अवलंबून आहे, ज्या आपल्याकडे पूर्वापार चालत आल्या आहेत. या चालीरीती प्रत्येक पिढीकडून पुढच्या पिढीला शिकविल्या गेल्या. पण काळाच्या ओघामध्ये या चालीरीती कुठेतरी मागे पडल्या आणि त्याऐवजी खानपानाच्या नवीन सवयी आपण आपल्याही नकळत आत्मसात केल्या. आयुर्वेदिक डायट किंवा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहारपद्धती आपण पुन्हा एकदा अवलंबली, तर त्याचा आपल्या आरोग्याला निश्चितच फायदा होईल.

आयुर्वेदामध्ये ताजे शिजविलेले अन्न फार महत्वाचे मानले गेले आहे. अन्न जितके शिळे असेल, तितके आपल्या शरीरास अपायकारक ठरू शकते. त्याशिवाय डबाबंद अन्नपदार्थ किंवा प्रोसेस्ड अन्नपदार्थ, फ्रीज मध्ये अधिक काळाकरिता साठवून ठेवलेले अन्नपदार्थ यांचे सेवन शक्यतो टाळावयास हवे. त्याचबरोबर अन्नाचा स्वाद वाढविण्याकरिता वापरली जाणारे कृत्रिम इसेन्स किंवा खाण्याचे रंग यांचा वापर करून तयार केलेले खाद्यपदार्थ देखील टाळायला हवेत. आयुर्वेदामध्ये शाकाहारी आहाराचे महत्व आहे कारण भाजी आणि फळे आपल्या शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करून शरीराची शुद्धी करतात.

आयुर्वेदातील आहारनियम आता परदेशांमधेही स्वीकारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे भारतीय भोजनच आयुर्वेदाप्रमाणे योग्य आहे असे म्हणता येत नाही. आपल्याकडील वरण – भात, भाकरी, खिचडी हा आहार आपल्याकडे उपलब्ध असेली धान्ये विचारात घेऊन आखला गेला. पण याला पर्यायी धान्ये परदेशामध्ये होत असल्याने तेथील आहार ही आयुर्वेदातील आहारनियमांप्रमाणे आखता येणे आता शक्य झाले आहे.

वजन कमी करणाऱ्या व्यक्ती सर्वात आधी साजूक तुपाला चार हात लांबच ठेवताना दिसतात. पण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे घरी कढविलेले साजूक तूप आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करावयास हवे. तुपामुळे शरीरातील घातक कोलेस्टेरोल कमी होऊन तुपाच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. यासाठीच आपल्याकडे खजूरासारख्या उष्ण प्रकृतीच्या खाद्यपदार्थाबरोबर तूप खाण्यास देण्याची पद्धत आहे. तुपामुळे पचनशक्ती चांगली राहून, पोट साफ होण्यासही मदत मिळते. तसेच साजूक तुपाच्या सेवनाने शरीरामधील वात आणि पित्त दोष शमण्यासही मदत होते.

भोजन घेण्याआधी थोडासा आल्याचा रस घेतल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच आयुर्वेदामध्ये आले, हे जठराग्नी प्रदीप्त करणारे, म्हणजेच भूक वाढविण्यास उपयुक्त म्हटले गेले आहे. जपानी खाद्यसंस्कृतीने या आहारनियमाचा अंगीकार केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment