नितळ त्वचेकरिता दालचिनीचा वापर


आपल्या एस्प्रेसो कॉफीचा स्वाद वाढविणे किंवा पुलाव, राजमा, इत्यादी पदार्थांचा स्वाद वाढविणारा मसाल्याचा सुवासिक पदार्थ म्हणजे दालचिनी. पण केवळ अन्नपदार्थांचा स्वाद वाढविणे एवढाच दालचिनीचा गुणधर्म नसून, ही दालचिनी आपल्या त्वचेच्या निगेसाठीही अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीचे औषधी गुणधर्म तर गेल्या कित्येक शतकांपासून मनुष्याला ज्ञात आहेत. दालचिनीचा उपयोग आपली त्वचा नितळ आणि सुंदर बनविण्यासाठीही केला जाऊ शकतो.

दालचीनीची पूड मधात मिसळून चेहऱ्याला लावल्यास मुरुमे पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचा सतत कोरडी पडत असल्यास एक केळे कुस्करावे, व त्यामध्ये एक लहान चमचा दालचिनीची पूड मिसळावी. ह्या पेस्ट मध्ये काही थेंब मधही घालावा. हा फेस मास्क चेहऱ्यावर दहा मिनिटे लाऊन ठेवावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. ह्या मास्क मुळे चेहऱ्याला आर्द्रता मिळून त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

कित्येकदा प्रदूषण, मानसिक तणाव इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडून अकाली वृद्धत्व आल्याप्रमाणे चेहरा दिसू लागतो. ह्या सुरकुत्या घालविण्यासाठी दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑईल मध्ये अर्धा लहान चमचा दालचिनीची पूड मिसळावी. ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण आठ ते दहा मिनिटे लावून ठेवावी. ह्या पेस्टमधील ऑलिव्ह ऑईल त्वचेमध्ये जिरून त्वचा आर्द्र होते आणि दालचिनीमुळे त्वचेवरील मुरुमे नष्ट होतात. दहा मिनिटे उलटून गेल्यानंतर स्वच्छ ओलसर टॉवेलने चेहरा पुसून काढावा.

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचा मुलायम, चमकदार बनविण्यासाठी दोन मोठे चमचे दालचिनीची थोडी जाडसर पूड घ्यावी. ही पूड फार भरड नेसेल याची काळजी घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा आणि ताजे दही घालावे. ह्या पेस्टच्या मदतीने चेहरा स्क्रब करावा. त्यामुळे त्वचेवरील सर्व मृत पेशी निघून जाऊन चेहरा नव्याने उजळेल. त्याचप्रमाणे त्वचेवरील काळे डाग घालाविण्यासाठीही दालचिनीची पूड व मधाचा वापर करता येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment