राज ठाकरेंना समाजवादीच्या अबू आझमींचा सल्ला


नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी टीका वजा सल्ला दिला आहे. वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, बाळासाहेबांच्या कुटुंबातील राज ठाकरे तुम्ही एक सदस्य आहात, त्यांच्याकडे पाहून तरी किमान असे वागू नका, असा नसता सल्ला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे.

राज ठाकरे भाजप जवळ शिवसेनेची वाटचाल आणि त्यांचा मुख्यमंत्री झालेला पाहून जात आहेत. पण, भाजपसमोर राज ठाकरे यांनी गुडघे टेकवू नये, असेही अबू आझमी म्हणाले. राज ठाकरे आणि भाजपची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अबू आझमी बोलत होते.

ज्या भाजपवर लोकसभा निवडणुकांपूर्वी मिमिक्री करुन हल्लाबोल केला. त्याच भाजपसोबत राजकारणासाठी जाणे योग्य नसल्याचे मत अबू आझमी यांनी मांडले आहे. आपल्या एका भूमिकेवर राज ठाकरे यांनी कायम राहावे, वारंवार धरसोड करु नये असा सल्लाही आझमी यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांना मुंबईत सर्वांनी मिळून मजबूत केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना भाजपला रोखण्यासाठी साथ देणे गरजेचे असल्याचेही अबू आझमी म्हणाले. मुंबईत राहूनही एवढ्या वर्षात कधीच उद्धव ठाकरे यांना भेटलो नव्हतो. पण, आता त्यांना भेटल्यावर ते उत्कृष्ट व्यक्ती असल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांना साथ देत असल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडली हे महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब असल्याचे मतही अबू आझमी यांनी व्यक्त केले. मुंबईतील निवडणुकीत भविष्यात शिवसेनेसोबत जाण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, ते त्यावेळी ठरवू, असे सांगत दारे खुली ठेवली आहेत.

नरेंद्र मोदी यांनी मते घेताना कोणताही पुरावा मागितला नाही. पण, आता लोकांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे मागितली जात आहेत. कितीही पुरावे मोदींनी मागितले तरी आम्ही एकही कागद देणार नसल्याचा इशारा ही अबू आझमी यांनी दिला आहे. एकप्रकारे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

Leave a Comment