चाइल्ड पोर्नोग्राफीचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल


औरंगाबाद – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या सूचनेनंतर सोशल मीडियावर बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली असून सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दहा जानेवारी) याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या यूजर्सच्या विरोधात छावणी आणि सातारा पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडून बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे. राज्यात विविध पोलिस ठाण्यात चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी पोक्सो कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून काही लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोला प्राप्त झाली होती.

एकाने हे व्हिडिओ फेसबुकसह इतर सोशल मीडियावर पसरविले होते. दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. या किळसवाण्या प्रकाराबाबत त्यांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना १८ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्वच सायबर क्राइम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. त्याचबरोबर यासंदर्भात छावणी व सातारा पोलिस ठाण्यात देखील गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

Leave a Comment