सुंदर मी होणार


रोजच्या धावपळीत आणि वाढत्या ताण-तणावात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणंही अनेकांना शक्‍य होत नाही. मग तिथं सौंदर्याचा विचार कधी करणार? पण दोस्तांनो, सुंदर दिसण्यात त्वचेच्या सौंदर्याचा भाग महत्त्वाचा ठरतो आणि काही साध्या-सोप्या उपायांनी तुम्ही त्वचेला उजाळा देऊ शकतात. त्यासाठी काय करावं, जाणून घेऊ…

स्वत:च्या प्रकृतीची पुरेशी काळजी घेणं होत नाही, अशी परिस्थिती आहे. सतत कार्यरत राहणं ही या काळाची गरज आहे. त्यासाठी तुमच्या शरीराची तसंच मनाची पुरेशी तयारी असण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, तेवढ्यानं भागतं असं नाही. सोबत तुमचं व्यक्‍तिमत्त्वही आकर्षक, प्रभावी असायला हवं. साहजिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न गरजेचे ठरतात. शारीरिक सौंदर्यात त्वचेच्या सौंदर्याचा भाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्वचा तजेलदार राहील, तिच्यावर सुरकुत्या असणार नाहीत वा डाग असणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. आता त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागणार का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात आला असेल. परंतु दोस्तांनो काही साध्या- सोप्या उपायांनी तुम्ही त्वचेचं सौंदर्य वृध्दींगत करू शकता.

* क्‍लिंजींग – रोजच्या धावपळीमध्ये चेहऱ्यावर जमा झालेली धूळ आणि इतर अशुद्धी घालवण्यासाठी सॅलिसिलिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड असलेल्या उत्पादनांचा वापर अवश्‍य करायला हवा. यामुळे तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ होण्यास मदत होते. साहजिक चेहऱ्याची चमक वाढते.

* हायड्रेटिंग – त्वचा धुवून कोरडी केल्यानंतर पुन्हा अधिक कोरडी होण्याची शक्‍यता असते. हे लक्षात घेऊन त्वचेचा ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रिमचा वापर करावा. त्वचा तेलकट असेल तर ऑईल बेस प्रॉडक्‍ट वापरण्याचं टाळायला हवं.

* ऍक्‍ने कमी करा – बऱ्याच जणांना वरचेवर ऍक्‍नेचा त्रास होत असतो. मुख्यत्वे चेहऱ्यावरच्या तैलग्रंथी जास्त प्रमाणात स्त्रवल्यास त्या ठिकाणी ऍक्‍नेचा त्रास होतो. अशा वेळी बेंझॉईल पेरॉक्‍साईडचा वापर ऍक्‍नेचा त्रास कमी करण्यास मदत करणारा ठरतो. त्यासाठी थोडंसं बेंझॉईल पेरॉक्‍साईड अक्‍ने प्रभावित क्षेत्रावर लावल्यास दिवसेंदिवस त्याचा प्रभाव कमी होत जातो. अक्‍नेने प्रभावित झालेल्या क्षेत्रावर ऑईल बेस क्रीमचा वापर टाळणंही हिताचं ठरतं.

* संरक्षण – त्वचेच्या काळजीमधला सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे संरक्षण. त्यासाठी त्वचेचं धूळ आणि उन्हापासून होता होईल तितकं संरक्षण करायला हवं. त्यासाठी झिंक ऑक्‍साईडची मात्रा असलेलं सनस्क्रीन लोशन वापरणं हा मार्ग उपयुक्‍त ठरतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment