कौशल्य विकास म्हणजे काय ?


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हे पद स्वीकारल्यानंतर आपले मंत्रिमंडळ तयार केले आणि त्यात कौशल्य विकास आणि उद्योजकता हे नवे खाते तयार केले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच असे खाते तयार करण्यात आले होते. कारण मोदी यांना या खात्याचे महत्त्व पटलेले होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी १९९१ साली व्हीजन २०२० हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथातल्या प्रतिपादनाचा आणि या कौशल्य विकासाच्या कल्पनेेचा निकट संबंध आहे. म्हणूनच आपण कौशल्य विकासाशी संबंधित अशी ही मालिका चालवताना आधी डॉ. कलाम यांच्या या ग्रंथाविषयी काही जाणून घेणार आहोेत. सुरूवातीला डॉ. कलाम यांना या ग्रंथाची कल्पना कशी सुचली याची हकिकत जाणून घेतली पाहिजे.

१९९० च्या आधी डॉ. कलाम हे मिसाईल मॅन म्हणून देशाला चांगलेच माहीत होते. त्यांना अनेक शाळा आणि महाविद्यालयातून व्याख्यानाची निमंत्रणे येत असत आणि व्याख्यानानंतर त्यामुळे प्रभावित झालेल्या मुला मुलींचा त्यांना गराडा पडत असे. अशाच एका शाळेत त्यांचे भाषण संपल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्या स्वाक्षरीसाठी आपल्या वह्या पुढे केल्या. त्यात ११ वर्षे वयाची एक चुणचुणीत मुलगी होती. डॉ. कलाम यांनी तिच्या वहीवर स्वाक्षरी करता करता तिला एक प्रश्‍न विचारला की तुला कोणत्या प्रकारच्या भारतात रहायला आवडेल ? त्यावर त्या मुलीने उत्तर दिले. मला विकसित भारतात रहायला आवडेल. एवढ्या या उत्तराने डॉ. कलाम यांच्या विचारांना चालना दिली.

या मुलीच्या मनातला विकसित भारत कसा असेल आणि तो तसा साकार होईल का असा विचार ते करायला लागले. त्यांनी विकसित भारताचे संकल्प चित्र तयार करायला सुरूवात केली. भारत हा अनेक क्षेत्रात विकसित होऊ शकतो. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, वीज निर्मिती, संरक्षण अशा किती तरी क्षेत्रात भारत विकसित कसा होईल याचा अभ्यास करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. त्यासाठी त्यांनी या सगळ्या क्षेत्रातल्या पाच हजार तंत्रज्ञांना एकत्र केले आणि त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात भारताला विकसित होण्याची किती संधी आहे याचा तलास करावा आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपण विकसित कसे होऊ शकू याचेही चित्र रेखाटण्यास त्यंाना सांगितले. त्या सर्वांनी तसा प्रयास केला आणि त्यातूनच डॉ. कलाम यांचा व्हिजन २०२० हा ऐतिहासिक प्रबंध साकार झाला. (क्रमश:)

Leave a Comment