बँकेची नोकरी सोडून शेती


शेती हा शाश्‍वत धंदा आहे. तो करताना निसर्गाशी झगडा करावा लागतोच पण या संकटावर मात केली तर शेती व्यवसायात चांगली प्राप्ती होते आणि जेवढे चांगले नियोजन कराल तेवढे चांगले उत्पादन होते. निसर्गाशी सख्य राखून हा व्यवसाय केला तर या व्यवसायात आनंद आणि समाधानही लाभते. शेती करणारांना अनेक प्रतिकूलतांशी सामना करावा लागत असल्याने त्यांना हा व्यवसाय नकोसा वाटतो पण ज्यांना नोकरी करण्यातला तोच तो पणा वैतागवाणा वाटतो त्यांना मात्र शेतीविषयी आकर्षण वाटते. असे अनेक लोक शेतीकडे वळायला लागले आहेत आणि शेतात नवे नवे प्रयोग करायला लागले आहेत. दिल्लीतल्या आयसीआयसीआय बँकेत अधिकारी असलेल्या दीपक गुप्ता यांनीही हाच मार्ग अवलंबिला आहे.

१९८० साली त्यांनी महाविद्यालयातले शिक्षण पूर्ण केले. एमबीए पदवी मिळवून आधी एचडीएफसी आणि नंतर आयसीआयसीआय या बँकांत द. आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग येथे तसेच कॅनडातल्या टोरांटो येथे नोकरीही केली. पण नोकरी करीत असताना त्यांना आपल्या देशातले आणि बाहेरचेही जीवन बारकाईने पाहता आले. रासायनिक खतांचा वापर करून केलेल्या शेतीचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागत असल्याने सारे जग आता सेन्द्रीय शेतीकडे वळत आहे असे त्यांना जगभर फिरताना दिसून आले. या विचार प्रवाहामुळे सेन्द्रीय शेतीत पिकलेल्या अन्नधान्याची मागणी वाढत आहे. तेव्हा आपण नोकरी सोडून सेन्द्रीय शेती करावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या मालकीची जमीन नव्हती तरीही त्यांनी हरियाणात जमीन भाडेपट्टयावर घेऊन तिथे आपली शेती सुरू केली.

त्यासाठी त्यांनी ऑर्गेनिक माती नावाची कंपनी स्थापन केली. त्यांना शेतीची कसलीही माहिती नव्हती पण त्यांना एक गुरू भेटला. सोनेपत येथील एक शेतकरी अशी शेती करतोय असे त्यांना कळले. त्यांनी या शेतकर्‍यापासून सारी माहिती करून घेतली आणि भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती सुरू केली. या शेतीत लागणारे भांडवल फार कमी असते आणि नंतर शेतीत कसलीही कीटकनाशके मारावी लागत नाहीत. बियांवर खर्च करावा लागत नाही. एखाद्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर तुम्ही दरसाल किमान ५० हजार रुपये तरी कमायी करू शकता. त्यांनी अशा १५ कुटुंबांना आपल्या प्रयोगाशी जोडले आहे आणि आपल्या शेतातला सेन्द्रीय माल स्वत:च विकण्याची यंत्रणाही विकसित केली आहे.

Leave a Comment