केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी हे उपाय अवलंबा


केसांमध्ये कोंडा होणे ही एखादी गंभीर व्याधी जरी नसली, तरी पुष्कळ त्रासदायक मात्र नक्कीच आहे. केसांमध्ये कोंडा झाल्याने डोक्यामध्ये सतत खाज सुटते. जर हा कोंडा खूपच जास्त प्रमाणात असेल, तर वैद्यकीय सल्ल्यची गरज भासू शकते. मात्र जर कोंडा अगदी थोड्याच प्रमाणात असेल, तर काही घरगुती उपायांनीच हा कोंडा संपूर्णपणे नाहीसा होऊन, केस निरोगी, सुंदर बनतात.

केसांना नियमितपणे तेलाने मसाज केल्यास डोके कोरडे पडत नाही. नारळाच्या तेलामध्ये केसांना व डोक्याला आर्द्रता प्रदान करणारी तत्वे आहेत, त्यामुळे नारळाचे तेल हलके गरम करून घेऊन त्याने केसांना मसाज करावा. या उपायाने केसांमधील कोंडा कमी होऊन रुक्ष झालेले केस पुन्हा मुलायम, चमकदार होतील.

व्हिनेगर आणि लिंबामध्ये असलेल्या अॅसिड्समुळे डोक्यामध्ये फंगसची वाढ रोखली जाऊन खाज सुटणे कमी होते. केस शॅम्पू ने धुतल्यानंतर दोन कप पाण्यामध्ये अर्धा कप व्हिनेगर मिसळून, त्या पाण्याने केस धुवावेत. जर लिंबाच्या रसाचा वापर करायचा असेल, तर थोडासा लिंबाचा रस दोन चमचे पाण्यामध्ये मिसळून, या मिश्रणाने डोक्यामध्ये मसाज करावा. पाच मिनिटे हे मिश्रण केसांमध्ये राहू देऊन त्यानंतर नेहमीप्रमाणे शॅम्पूने केस धुवून टाकावेत.

कडुनिंब आणि कढीपत्त्याची पाने केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. या दोन्हीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल तत्वे असल्याने डोक्याची खाज कमी होते, व कोंडाही नाहीसा होतो. एक मुठभर कडूनिंबाची पाने चार कप पाण्यामध्ये, पाणी निम्मे होईपर्यंत उकळून घ्यावीत. थंड झाल्यानंतर या मिश्रणाने केसांची, आणि विशेषतः जिथे खाज सुटते आहे, त्या डोक्याच्या भागाची मालिश करावी. कढीपत्त्याची व कडूनिंबाची पाने खोबरेल तेलामध्ये कढवून तेल गळून घ्यावे, व हे तेल डोक्याला लावावे. त्याने ही कोंडा कमी होण्यास मदत होईल.

मेथी दाण्यांची पेस्ट ही कोंड्यावर गुणकारी आहे. ही पेस्ट बनविण्याकरिता मेथी दाणे दोन ते तीन तासांकरिता पाण्यामध्ये भिजत घालावेत. त्यानंतर त्याची बारीक पेस्ट वाटून घ्यावी. ह्या पेस्ट मध्ये आवळकाठीची पावडर व थोडे दही मिसळून, ही पेस्ट दहा मिनिटे केसांना लावून ठेवावी. त्यानंतर केस स्वच्छ धुवून टाकावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment