ही खरी माणुसकीची भिंत


(फोटो सौजन्य- द बेटर इंडिया)
सध्या सगळ्या महाराष्ट्रात विविध स्वयंसेवी संघटना गरीब आणि श्रीमंत यांच्यातली विषमतेची दरी सुसह्य करण्यासाठी माणुसकीची भिंत हा उपक्रम आयोजित करायला लागल्या आहेत. या उपक्रमात सुखवस्तु लोकांना त्यांचे चांगले पण वापरातले कपडे गरिबांसाठी देण्याचे आवाहन केले जाते. हा उपक्रम चांगलाच आहे पण असाच उपक्रम अन्नाच्या बाबतीतही आयोजित करण्याची गरज आहे कारण आपल्या देशात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांत अन्नाची नासाडी करण्याची सवय आहे. या लोकांकडून टाकून दिले जाणारे असे अन्न नीट जमा केले तर ते कितीतरी गरिबांना देता येईल आणि पुरेसे अन्न न मिळाल्याने अशक्त राहणार्‍या गरिबांच्या मुलांची पोटे भरता येतील.

प. बंगालातील असनसोल या शहरातल्या चंद्रशेखर कुंडू या शिक्षकाने हा उपक़्रम राबविला असून शहरातले नित्य अन्न वाया घालवणारे लोक शोधून काढले आहेत. अनेक श्रीमंत लोक, हॉटेल्स, खानावळी, हॉस्टेल्स येथे वाया जाणारे अन्न रात्रीच जमा केले जाते आणि ते ताबडतोब गरिबांना वाटले जाते. ही मोहीम चालवण्याआधी कुंडू यांनी एक फूड एज्युकेशन अँड इकानॉमिक डेव्हलपमेंट (फीड)नावाची संघटना स्थापन केली. वाया जाणार्‍या अन्नाच्या बाबतीत लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी नंतर आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या कामात सामील करून घेतले. आता दररोज बरेच अन्न संकलित केले जाते आणि ते ताजे असते. ते हाती पडल्यानंतर जास्तीत जास्त तीन तासांत गरीब मुलांच्या पोटात जाईल असे त्याचे वितरण केले जाते. अशा रितीने दररोज झोपडपट्टीतल्या शेकडो मुला मुलींना दोन वेळचे ताजे आणि सकस अन्न मिळते.

कुंडू यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी कुंडू यांच्या घरीच बरेच अन्न वाया गेले. ते बघून त्यांना हे अन्न गरीब मुलांना दिले असते तर किती बरे झाले असते असा विचार सुचला. त्यातून ही चळवळ सुरू झाली. आता ही चळवळ प. बंगालच्या अन्य दहा शहरात पसरणार आहे. कोलकत्यात आताच अशा प्रकारचा उपक्रम सुरू असून अनेक गरीब मुलांना त्यातून पोटभर अन्न मिळते. भारतात दोन वेळा नीट खायला न मिळणारी एक कोटी दहा लाख मुले आहेत. त्या सर्वांना या उपक्रमातून सहज खायला मिळू शकते. पण त्या साठी त्या त्या गावात असे कोणी तरी उभे राहिले पाहिजे. प्रश्‍न मोठा आणि अवघड वाटतो पण काही शहरांत असे शिक्षक निर्माण झाले तर देशातला एकही गरीब मुलगा उपाशी झोपणार नाही.

Leave a Comment