पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांचा तानाजी सावंतांवर रोष


मुंबई : शिवसैनिकांमध्ये शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात नाराजी वाढली असून तानाजी सावंत यांनी घेतलेल्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे तानाजी सावंतांवर शिवसैनिकांचा रोष आहे. दरम्यान आज दुपारी मातोश्रीवर सोलापूर आणि उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली आहे. पण तानाजी सावंतांच्या या बैठकीला अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली असून पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली जात आहे.

तानाजी सावंत मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झाले होते. त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. याचा फटका शिवसेनेला याठिकाणी निवडणुकीत बसला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही दांडी मारली होती. एकूणच शिवसेनाविरोधी भूमिका तानाजी सावंतांनी घेतल्याने शिवसैनिक नाराज आहेत. आता तानाजी सावंताची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.

दरम्यान सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदावरून लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याबद्दलची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका लक्ष्मीकांत ठोगें पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्याने सोलापुरात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर तानाजी सावंत गटाने उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला साथ दिली. पक्षाला सावंतांची ही भूमिका चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. दरम्यान सोलापूर जिल्हाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment