मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजेंचे उपोषण मागे


पुणे: खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून झालेल्या चर्चेनंतर मागे घेतले आहे. या उपोषणासाठी संभाजीराजेंसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.

आज, पुण्यात सरकारच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. सारथी या संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना तात्काळ पदावरून हटवण्यात येईल. सारथी संस्थेबाबत त्यांनी काढलेले सर्व जीआर मागे घेण्यात येत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले होते. खासदार संभाजीराजे यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसले होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सारथीबाबत सनदी अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी काढलेले सर्व जीआर मागे घेत असल्याचं सांगून गुप्ता यांना तात्काळ पदावरून दूर करण्यात येत आहे, अशी घोषणा केली. उपोषणस्थळी जाऊन शिंदे यांनी खासदार संभाजीराजेंची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती.

Leave a Comment