आता कोंबड्या देणार औषधी अंडी!


सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीनंतर आता औषधी अंडी देणाऱ्या कोंबड्या येत आहेत. जपानी शास्त्रज्ञांनी कोंबड्यांच्या गुणसूत्रात काही बदल करून अशा कोंबड्या तयार केल्या आहेत. या कोंबड्या औषधी अंडे देतात आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी लढण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

योमियुरी शिम्बून नावाच्या जपानी नियतकालिकात या संशोधनाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. सध्याच्या उपचार व औषधांच्या तुलनेत या अंड्यांपासून बनणारी औषधे अधिक किफायती असतील, असा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.

जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडवान्स्ड इंडस्ट्रियल सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी गुणसूत्रांच्या मदतीने कोंबड्यांमध्ये इंटरफिरोन बीटा पेशी निर्माण केल्या. या पेशी चिकन स्पर्मच्या आधीच्या प्रक्रियेत असतात. त्यानंतर या पेशींचा उपयोग अंड्यांचे फलन करण्यासाठी करण्यात आला जेणेकरून अशा औषध असलेले अंडे देणाऱ्या कोंबड्या निर्माण करता याव्यात.

सध्या या शास्त्रज्ञांकडे असे अंडे देणाऱ्या तीन कोंबड्या असून त्या दररोज औषधयुक्त अंडी देतात. शास्त्रज्ञ ही अंडी औषधी कंपन्यांना अर्ध्या किमतीत विकण्याची योजना बनवत आहेत. यामुळे औषधांच्या किमती जरूर कमी होतील, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment