त्वचा सुंदर बनविण्यासाठी चॉकलेट वापरून बनवा फेस मास्क


लहान मुलांपासून ते अगदी घरातील वडिलधाऱ्या मंडळींपर्यंत सर्वांचाच, चॉकलेट हा मनापासून आवडणारा पदार्थ आहे. काहीतरी गोड खाण्याची इच्छा अनावर होत असेल, तर गोड पदार्थ बनवत बसण्यापेक्षा एखादे चॉकलेट पटकन उचलून तोंडात टाकणे हा सर्वात सोपा पर्याय आहे. पण दुर्दैवाने हा पर्याय आपल्या वजनाकरिता तेवढा चांगला नाही. चॉकलेटचा भरपूर वापर, खाण्याऐवजी त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी जर केला गेला, तर त्याचा चांगलाच फायदा दिसून येतो. चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि त्वचेला आर्द्रता देऊन मृदू बनविणारे घटक मोठ्या प्रमाणामध्ये असून, त्यामुळे त्वचा नितळ व सुंदर दिसू लागते.

चॉकलेट आणि ओटमील वापरून बनविलेला फेस मास्क तेलकट त्वचा असणाऱ्या किंवा ज्याच्या चेहऱ्यावर मुरुमे पुटकुळ्या येतात, अश्या व्यक्तींकरिता उत्तम आहे. ह्या मास्क मुळे त्वचेवरील मृत पेशी हटविल्या जाऊन त्वचा नितळ होते. हा फेस मास्क बनविण्याकरिता एक मोठा चमचा कोको पावडर, दोन चमचे ओटमील आणि थोडा मध एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. पंधरा मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर राहू देऊन मग कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.

साखरेमध्ये त्वचेला मृदू बनविणारे ग्लायकोलिक अॅसिड असते, तर कॉफीमध्ये त्वचेवरील सुरकुत्या कमी करणारी तत्वे असतात. ह्या दोन्हीचा वापर करूनही चांगला फेस मास्क तयार करता येतो. अर्धा कप ब्राऊन शुगर मध्ये चार मोठे चमचे कॉफी पावडर घालावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे कोको पावडरही मिसळावी. या मध्ये थोडेसे मध घालून घट्ट पेस्ट तयार करावी व या पेस्ट ने चेहऱ्यावर हळुवार मसाज करावा. या स्क्रब मुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन चेहरा तजेलदार दिसू लागतो.

चॉकलेट बॉडी बटर चा वापर संपूर्ण शरीरावरील त्वचेला आर्द्रता मिळावी म्हणून करवयाचा असतो. अर्धा कप चॉकलेट बटर मध्ये अर्धा कप कोको पावडर व थोडेसे खोबरेल तेल घालून हे मिश्रण वीस मिनिटे फ्रीज मध्ये ठेवावे. फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर हे मिश्रण काहीसे घट्ट होते. त्यानंतर एका हँड ब्लेंडरच्या मदतीने हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. त्यानंतर आपल्या आवडीच्या सुवासाच्या इसेन्शियल ऑईल चे काही थेंब या मिश्रणात घालावेत. हे बॉडी बटर संपूर्ण शरीरावर लावून वीस मिनिटे ठेवावे, व त्यानंतर कोमट पाण्याने अंग धुवून टाकावे. तयार चॉकलेट बटर बाजारामध्ये मिळते. यामध्ये बाकीचे साहित्य घालून बॉडी बटर घरच्याघरी तयार करता येते.

Leave a Comment