कठीण प्रसंग कायमस्वरूपी नसतो…


तरुणांच्या आयुष्यात तर कुटुंब, करिअर, रिलेशनशिप, नोकरी, व्यवसाय यातूनच कठीण परिस्थिती निर्माण होताना दिसते. अशी कठीण परिस्थिती आयुष्यात किमान एकदा तरी येतेच आणि यातून जी व्यक्ती चांगला सुवर्णमध्य काढून पुढे जाते तीच व्यक्ती तरते. तुमचा एक चुकीचा निर्णय, घाईघाईत घेतलेला निर्णय आयुष्याची दिशा बदलणारा ठरतो, त्यामुळे तो योग्य आणि विचारपूर्वक घेणे आवश्‍यक असते. तुमच्या आयुष्यात आलेला कोणताही कठीण प्रसंग हा कायमस्वरूपी नसतो हे लक्षात घ्या.

नवे मार्ग शोधा – प्रत्येक समस्येवर एक तरी उपाय असतोच, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे नैराश्‍यात जाण्याची काही गरज नाही. यापेक्षा नव्या पर्यायांचा विचार करा. पूर्वी ज्या चुका झाल्या त्या कशा टाळता येतील याचा विचार करा.

ऑनलाइन फोरम्स -तुमच्या समस्या कुटुंब किंवा मित्रांसमोर मांडायला संकोच वाटत असेल, तर व्हर्च्युअल विश्‍वातील काही समूहांची(ग्रुप्स) मदत घेऊ शकता. सोशल मीडियावरील अशा ग्रुप्सवर तुमचे नेहमीच स्वागत असते. उदाहरणार्थ, तुमची नोकरी गेली असेल तर लिंक्‍डइनसारख्या सोयी आहेत, ज्यातून तुम्ही ऑनलाइन मित्रांच्या मदतीने नोकरीच्या संधी शोधू शकता.

सकारात्मक समूहांशी जोडले जा – तुमच्या दृष्टीने समजा रिलेशनशिप, ब्रेकअपवरून काही समस्या असतील, तर या संदर्भात मार्गदर्शन करणारे काही ग्रुप्स (समूह) आपल्या शहरात कार्यरत असतात, त्यांची माहिती घेऊन त्यांना भेटा. तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. त्यातून ही समस्या तुमच्या एकट्याची नाही, हे कळेल. अशा परिस्थितीतून बाहेर पडलेल्या अनेक व्यक्ती येथे भेटतील. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या मनातील एकटेपणाची भीती कमी होईल.

हास्योपचार – सर्व समस्यांवर एक मोठा आणि परिणामकारी उपचार म्हणजे हास्योपचार. कितीही कठीण प्रसंग असू द्या. स्वत:वर हसायला शिका. कठीण प्रसंगातून आलेल्या ताणावर मात करण्यासाठी हास्योपचार अगदी रामबाण औषध आहे.

कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून शिका -एखाद्या आर्थिक संकटातून किंवा भावनिक गुंतागुंतीमध्ये अडकल्यानंतर कुटुंब किंवा मित्रपरिवाराची मदत घ्या. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याकडे, मित्राकडे छोटीशी मदत मागून या समस्या सोडवू शकता. मात्र या समस्येतून बाहेर पडल्यावर प्रामाणिकपणे त्याची परतफेड करायला विसरू नका.

मूव्ह ऑन -आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी सरळ होत नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा ही परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करून पुढे जायला शिका. तसेच पुढे येणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ठेवा, तरच तुम्ही आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर सक्षमपणे परिपक्वतेने मात करू शकाल.

Leave a Comment