चित्रकार असलेल्या या डिलिव्हरी बॉयचे एका ट्विटमुळे बदलले आयुष्य

विशाल समजिस्कर हा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर आहे. सध्या सोशल मीडियावर विशाल आपल्या कलेमुळे चर्चेत आला आहे. निखिल नावाच्या एका ट्विटर युजरने विशालच्या चित्रांचे काही फोटो प्लॅटफॉर्मवर शेअर केले. हे फोटो ट्विटरवर खूपच व्हायरल झाले असून, विशालनी काढलेल्या चित्रांना सोशल मीडियावर युजर्सनी देखील दाद दिली.

ट्विटर युजर निखिलने विशालच्या चित्रांचे फोटो शेअर करत लिहिले की, हा विशाल आहे. याने माझी स्विगीची ऑर्डर पोहचवली. तो एक कलाकार असून, तो कामाच्या शोधात आहे. जर तुम्हाला काही पेंटिंग/ वॉल आर्ट करायचे असतील तर मला सांगा. मी त्याच्याशी तुमची भेट घालून देईल.

निखिलने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आतापर्यंत या ट्विटला 11 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. तर शेकडो युजर्सनी कामासाठी ऑफर्स देखील दिल्या.

याविषयी विशाल समजिस्कर म्हणाला की, निखिलने माझ्याबद्दल ट्विट केले आहे हे मला माहिती नव्हते. मी त्याला डिलिव्हरी देण्यास गेलो त्यावेळी त्याने मला पाणी हवे का असे विचारले आणि तेव्हाच आमचा संवाद सुरू झाला.

विशालने पुढे सांगितले की, त्याने मला विचारले की मी काय करतो ? यावर मी आर्टिस्ट असल्याचे सांगितले. मला वाटते त्याला माझे काम आवडले असावे म्हणून त्याने ट्विट केले. ट्विट केल्याची माहिती त्याने मला फोन केल्यावर समजली.

ट्विट व्हायरल झाल्यानंतर आर्टवर्कसाठी शेकडो कॉल विशालला येत आहेत.

 

Leave a Comment