समृद्ध इतिहासाचा वारसा मिरविणारे जुनागढ - Majha Paper

समृद्ध इतिहासाचा वारसा मिरविणारे जुनागढ


गुजरातमधील गिरनार पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले जुनागढ समृद्ध इतिहासाचा वारसा जतन केलेले शहर आहे. गुजरात मधील सर्वात उंचीवर असलेले हे शहर. येथे ८०० पेक्षा अधिक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत तसेच मकबरासारख्या अनेक सुंदर ऐतिहासिक वास्तू आणि गुजरातच्या प्रसिद्ध बावडी पैकी एक बावडी येथे पाहायला मिळते. त्यामुळे या शहराला महागढ असेही म्हटले जाते.

येथे पाहण्याजोगी अनेक सुंदर आणि प्रसिध्द ठिकाणे आहेत. त्यातील काही आवर्जून पाहायला हवीत ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे. त्यातील एक आहे भवनाथ मंदिर. गिरनारच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर नागा साधूंचे जग दाखविणारे आहे. या शिवमंदिरात महाशिवरात्रीला नागा साधूंच्या झुंडी पाहायला मिळतात आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या गजराने दुमदुमतो. जवळच असलेले कालिका मंदिर अघोरी पंथीयांचे श्रद्धा आणि उपासना स्थळ आहे. भवनाथ मंदिरात गेल्यावर या मंदिरात दर्शन घेण्याची प्रथा साधू लोक पाळतात.


गिरनार पर्वताच्या उंच शिखरावर दत्तात्रेय मंदिर आहे. नाथपंथीयांचे हे श्रद्धास्थान असून येथे जाण्यासाठी १० हजार पायऱ्या चढाव्या लागतात. येथील सोरठ गड हा किल्ला आवर्जून पाहावा असा. मौर्य राजांच्या काळात तो बांधला गेला आणि त्यानंतरच्या प्रत्येक राजवंशाने त्यात नवीन वास्तू बांधून भर घातली. दगडी पायऱ्या चढून गेल्यावर या किल्ल्यात जाता येते. या भोवती खंदक असून पूर्वी तेथे मगरी सोडलेल्या असत त्यामुळे शत्रूला या किल्ल्याच्या भिंतीला कधीच भगदाड पाडता आले नाही असे सांगतात.


किल्ल्यात नऊ मजले खोलीची अडी कडी वाव म्हणजे विहीर आहे. या खोल विहिरीत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. ही विहीर खोदायला घेतली तेव्हा त्याला खूप खोल गेल्यावर थोडेसे पाणी लागले मात्र त्यावेळी अडी आणि कडी या दोन बहिणींनी येथे बलिदान केले आणि विहीर पाण्याने भरली अशी कथा सांगतात. विहिरीच्या काठावर असलेल्या झाडाला या दोन बहिणीचा मान म्हणून बांगड्या आणि चुनरी बांधण्याची प्रथा आहे.

Leave a Comment