प्रिन्स हॅरी, मेगनचा पुतळा शाही दालनातून हटविला


लंडनच्या जगप्रसिध्द मादाम तुसाँच्या मेणाच्या म्युझियममधून प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांचा पुतळा शाही दालनातून बाहेर काढला गेला असल्याचे समजते. ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा त्यागुन आर्थिक स्वावलंबनासाठी काम करण्याचा निर्णय प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल यांनी जाहीर केल्यावर ब्रिटीश मिडियामध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तुसाँ म्युझियमची ही कृती अशीच नाराजीची प्रतिक्रिया असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मादाम तुसाँच्या प्रदर्शनात जगभरातील प्रसिध्द व्यक्तींचे मेणाचे पुतळे बसविले गेले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचे पुतळे येथे महाराणी एलिझाबेथ द्वितीय, प्रिन्स फिलीप, प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट यांच्यासोबत एका खास शाही दालनात ठेवले गेले होते पण आता हे दोघे शाही जबाबदाऱ्यांपासून दूर राहणार असल्याची घोषणा त्यांनी केल्यावर त्यांचे पुतळे येथून हटविले गेले आहेत.

दरम्यान मेगन मर्केलच्या प्रवक्त्याने मेगन तिच्या मुलाला भेटण्यासाठी कॅनडाला परतली असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment