टीम इंडियाची नववर्षाची विजयी सुरवात, टी २० मालिका जिंकली


टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी २० सामन्याची मालिका टीम इंडियाने २-० अशी जिंकून नवीन वर्षाची यशस्वी सुरवात केली आहे. पुण्यात १० जानेवारीला झालेल्या या डे नाईट सामन्यात टीम इंडियाने ७८ धावांनी विजय मिळविला आहे. हा या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना होता. नवदीप सैनि याला मॅन ऑफ द सिरीज तर शार्दुलला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

सामन्याची सुरवात टीम इंडियाचे सलामी फलंदाज लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दमदार करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर मधली फळी गडगडली तरी संघाने ६ विकेटमध्ये २०१ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेने पॉवरप्ले मध्ये पहिल्या चार विकेट गमावल्या आणि पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामन्यात थोडी चुरस निर्माण झाली खरी पण ही जोडी फुटली आणि लंकेचा डाव १५.५ ओव्हरमध्ये १२३ वर संपुष्टात आला. त्यात लंकेचे धनंजय डीसिल्व्हा ५७ आणि अँजेलो मॅथ्यु ३१ या दोघानाच दुहेरी धावसंख्या करता आली.

लंकेच्या शेवटच्या सहा विकेट अवघ्या २९ धावात गारद झाल्या. नवदीप सैनिने यशस्वी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना २८ धावा देऊन तीन फलंदाज बाद केले तर शार्दुलने १९ धावा देऊन दोन फलंदाज बाद केले. भारताचा हा श्रीलंकेविरुद्ध टी २० मधला १३ वा विजय आहे. या मालिकेतील पहिला सामना इंदोर येथे खेळाला गेला होता तो भारताने ७ विकेट राखून जिंकला होता तर दुसरा गोवाहाटी येथे होणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

Leave a Comment