एकाच वेळी जन्मल्या चार बहिणी, एकाच दिवशी विवाह


केरळ मध्ये एकाच वेळी जन्मलेल्या चार बहिणी आता एकाच दिवशी विवाह करणार असून हा सोहळा २६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. विवाहाची तयारी मात्र आता सुरु झाली आहे. केरळमध्ये १८ नोव्हेंबर १९९५ साली या चार बहिणी आणि त्यांचा भाऊ अश्या पाच भावंडांचा जन्म झाला आणि एकाचवेळी पंचाळे झाल्याने त्याच्या बातम्या त्यावेळच्या पेपरमध्ये झळकल्या होत्या. प्रेमकुमार आणि रमादेवी या जोडप्याच्या पोटी ही पाच मुले जन्माला आली आणि त्यांच्या जन्माने आनंदित झालेल्या या जोडप्याने घराचे नाव पंचरत्न असे ठेवले.

उत्तरा, उत्तरजा, उत्ततारा, उत्तम्मा अशी या बहिणींची नावे असून त्यांच्या सोबतच जन्माला आलेल्या भावाचे नाव उत्तराजन असे आहे. वयाची १५ वर्षे एकाच शाळेत, एका छताखाली, एकसारखे कपडे, एकसारखे खाणे अश्या स्थितीत घालविलेल्या या बहिणी आता मात्र नोकरी व्यवसायामुळे वेगळ्या राहत आहेत. तरीही त्यांचा विवाह एकाच दिवशी व्हावा ही त्यांच्या आईची इच्छा त्या पूर्ण करत आहेत. त्यासाठी सारख्या रेशमी साड्या, सारखे दागिने यांची खरेदी सुरु झाली आहे.

ही सर्व भावंडे चांगली शिकली आहेत आणि स्वतःच्या पायावर उभी आहेत. त्यांच्या वडिलांनी व्यवसायात नुकसान आल्याने ही मुले ९ वर्षाची असताना आत्महत्या केली होती मात्र त्यांच्या आईने बँकेत नोकरी करून प्रपंचाचा भार यशस्वीरित्या पेलला आणि मुलांना मोठे केले असे उत्तरा सांगते.

हा हिंदू परिवार असल्याने त्यांचा विवाह हिंदू पद्धतीने मंदिरात होणार आहे. जवळचे नातेवाईक बोलावले जाणार आहेत. या चौघी बहिणींचा भाऊ उत्तराजन याने मात्र काही काळ परदेशात राहून पैसे साठवून मग विवाहाचा विचार करण्याचे ठरविले आहे.

Leave a Comment