जगभरातील लोक सुख, संपत्ती, पैसा, आनंद आणि ऐशो आराम याकडे धावत असताना, ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्य प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगनने राजघराण्याती पद त्यागून आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांनी बुधवारी पत्रकाद्वारे आपला हा निर्णय सांगितला. सोबतच आता ते राजघराण्यातील वरिष्ठ सदस्य राहणार नाहीत. दोघेही मिळून काम करतील व आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहतील. दोघांनीही 19 मे 2018 ला लग्न केले होते. दोघांच्याही या निर्णयामुळे ब्रिटनच्या राजघराण्याला नक्कीच धक्का बसला आहे.

या निर्णयानंतर दोघेही जण युके अथवा उत्तर अमेरिकेत राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेगन अमेरिकन आहे व ती आपल्या आईच्या खूप जवळची असून, तिची आई कॅलिफोर्नियामध्ये राहते. दोघेही कॅनडामध्ये देखील राहू शकतात, असे म्हटले जात आहे. कारण दोघेही काही दिवसांपुर्वीच कॅनडावरून सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतले आहेत.

दोघेही ब्रिटन अथवा उत्तर अमेरिकेमध्ये राहतील. मात्र यावेळीही महाराणी आणि अन्य संस्थेंबद्दल असलेला सन्मान आणि समर्थन आधीप्रमाणेच कायम असेल.

प्रिन्स हॅरी आणि मेगनने सांगितले की, या निर्णयामुळे त्यांच्या 8 महिन्यांचा मुलगा आर्कीला सांभाळण्यास मदत होईल. त्याचे पालनपोषण करण्यास अधिक वेळ मिळेल.
बकिंघम पॅलेसने म्हटले की, सध्या ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्ससोबत बोलणे सुरू आहे. आता सर्व प्राथमिक टप्प्यात आहे. आम्ही त्यांच्या इच्छा व भावना समजतो, ज्यामुळे त्यांना काहीतरी वेगळे करायचे आहे. हे गुंतागुंतीचे असून, यावर काम करण्यास वेळ लागेल.