गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या आरोपीला झारखंडमधून अटक


बंगळुरू – पोलिसांच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकर याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष तपास पथकाने याआधी १७ जणांना अटक केली असून याप्रकरणी आता १८ वी अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील धनबाद येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

झारखंडमधील धनबाद जवळील कटरास येथून ऋषीकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४) याला गुरुवारी अटक करण्यात आली, अशी माहिती विषेश तपास पथकाचे अधिकारी एम. एन अनुचित यांनी सांगितले. कटासर येथे दुर्गम स्थळी देवडीकर ओळख लपवून राहत होता. ऋषिकेश, राजेश, मुरली, शिवा अशी खोटी नावे सांगून तो राहत होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर पुरावे मिळवण्यासाठी त्याच्या घराची झडती घेतली. त्याला आज जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी देवडीकर हा प्रमुख आरोपी होता, अशी माहिती पोलिासांनी दिली.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ ला बंगळुरूमधील राजेश्वरीनगर भागातील घरी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. यातील दोन आरोपी फरार होते. विकास पाटील उर्फ निहाल आणि ऋषीकेश उर्फ मुरली अशी फरारी आरोपींची नावे होती. पोलिसांनी यातील १८ व्या आरोपीला अटक केली आहे. संघटीत गुन्हेगारांनी ही हत्या घडवून आणल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. या टोळीचा अमोल काळे प्रमुख असून विकास पाटील आणि अमोल देवडीकर मुख्य सदस्य होते.

Leave a Comment