३६ वर्षानंतर पुन्हा एकाचवेळी चौघांना होणार फाशी


निर्भया रेपकेस मधील चार गुन्हेगारांच्या फाशीसाठी २२ जानेवारीची तारीख न्यायालयाने जाहीर केली असून या दिवशी चौघाजणांना एकदम फासावर लटकविले जाणार आहे. अश्या प्रकारे एकाचवेळी चौघांना फाशी देण्याची घटना पुण्यात ३६ वर्षापूर्वी घडली होती. त्यावेळी जोशी अभ्यंकर या गाजलेल्या खून खटल्यातील दोषींना एकाचवेळी पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर चढविले गेले होते. निर्भया रेप फाशी प्रकरणाने पुणेकरांनी ३६ वर्षापूर्वी अनुभवलेल्या भीती आणि दहशतीच्या भावनांना त्यामुळे उजाळा मिळाला आहे.

जानेवारी ७६ ते ७७ या एकवर्षात पुण्यात १० जणांना अमानुषपणे घरात घुसून ठार केले गेले होते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या खुनांची बातमी पेपरच्या पहिल्या पानावर झळकण्याचा प्रकार दोन वेळा घडला आणि शहरात दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यात जोशी, अभ्यंकर या दोन कुटुंबातील लोकांना ठार केले गेले होते तसेच नंतरच्या तपासात गुन्हेगारांनी आणखी खून केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात दोषी ठरलेले गुन्हेगार पुण्याचा अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि केवळ चैन म्हणून त्यांनी हे खून केले होते. त्यातील पहिला खून त्यांनी त्यांचा वर्गमित्र हेगडे याचे अपहरण करून केला होता. जक्कल, सुतार, जगताप आणि शाह अशी या मुलांची आडनावे होती.

या प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या प्रकरणाचा तपास करणारे तेव्हाचे एसीपी शरद अवस्थी यांनी या तपासाच्या आठवणी जागविल्या आणि चौघा गुन्हेगारांना फाशी झाल्यावर लोकांनी सुटकेचा निश्वास कसा टाकला, कोर्टात केस ऐकण्यास किती गर्दी होत असे आणि खून सत्र सुरु असताना शहरात सायंकाळी सहा नंतर कसा शुकशुकाट होत असे याच्या आठवणी सांगितल्या.

Leave a Comment