तरुण संशोधकाने तयार केली अँटी टीझिंग लिपस्टिक गन


म्हटले तर मेकअपची सोय आणि म्हटले तर स्वसंरक्षण अश्या दोन्ही प्रकारे उपयोग होईल अशी एक लिपस्टिक बनारस मधील तरुण संशोधक शाम चौरसिया यांनी तयार केली असून त्याला अँटी टीझिंग लिपस्टिक गन असे नाव दिले आहे.

दिसायला अगदी लिपस्टिक प्रमाणे पण कुणी छेडछाड केलीच तर त्याला चांगलीच जरब बसविण्याचे काम ही वस्तू करेल. अर्थात या लिपस्टिकचा उद्देश फक्त छेड काढणाऱ्या अथवा विनाकारण त्रास देणाऱ्या रोड रोमियोना घाबरविण्यासाठी करता येईल मात्र त्याचबरोबर मदत मिळविणे आणि हेल्पलाईनला आपोआप कॉल होण्यासाठी होणार आहे.

चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार एरवी लिपस्टिक प्रमाणे वापर करता येणारी ही वस्तू अचानक संकट आले तर त्यावरचा ट्रिगर दाबला तर महिलांना मदत मिळवून देऊ शकेल. हा ट्रिगर दाबला की गोळी झाडल्याचा मोठा आवाज येईल. हा आवाज आसपासच्या १ किमी परिसरात ऐकू जाईल त्यामुळे आजूबाजूचे लोक सावध होतील आणि संबंधित महिलेकडे जवळच्या लोकांचे लक्ष वेधले जाईल. शिवाय रोड रोमिओ घाबरतील ते वेगळे. इतकेच करून ही लिपस्टिक थांबणार नाही तर आपोआप ११२ हा हेल्पलाईन नंबर डायल होईल. महिलेचे लाईव्ह लोकेशन पोलिसांना समजू शकेल. तसेच शेवटचा जो नंबर फोनवर डायल झाला असेल त्या नंबरवर कॉल जाईल.

ही लिपस्टिक गन बनविण्यासाठी चौरसिया याना सहा महिने लागले असून त्यासाठी ५०० ते ६०० रुपये खर्च आला आहे. यात ३.७ पॉवर बॅटरी दिली गेली असून ब्ल्यू टूथचा वापर केला गेला आहे. एकदा चार्ज केल्यावर ती अनेक दिवस चालेल. आणीबाणीत ट्रिगर दाबला की ब्ल्यूटूथ मुळे स्मार्टफोन अनलॉक होऊन ११२ व शेवटचा डायल केलेला नंबर लावला जाईल. या फोनचे ऑडीओ रेकॉर्डिंग होऊ शकणार आहे. चौरसिया यांनी या प्रकारे महिलांना आत्मरक्षण करता येईल अशी अनेक उपकरणे बनविली असून त्यात अँटी रेप सँडलचा समावेश आहे.

Leave a Comment