पाण्यावर चालणारी इलेक्ट्रिक बाईक सादर


अमेरिकेच्या लासवेगास येथे सुरु असलेल्या सीइएस मध्ये न्यूझीलंडची स्टार्ट अप कंपनी मँटासने एक अनोखी बाईक सादर केली आहे. ही बाईक इलेक्ट्रिक आहे मात्र तिचे वेगळेपण असे की ती पाण्यावर चालविण्याचा आनंद युजर घेऊ शकतो. हायड्रोफॉयलर एक्सइ-१ या नावाने ती शो मध्ये लाँच करण्यात आली असून तिची विक्री सध्या फक्त ब्रिटन मध्ये केली जाणार आहे.

ही बाईक पाण्यावर ताशी १९ किमीच्या वेगाने धावू शकते. तिला चाकांच्या जागी प्रोपेलर दिला गेला असून त्यामुळे बाईक पाण्याच्या वर राहण्यास मदत होते. रायडर पॅडल मारून त्याचा वेग वाढवू शकतो. नद्या, सरोवरे आणि समुद्रात ती चालविता येते. तिची बॉडी कार्बन फायबर आणि एअरक्राफ्ट ग्रेड अल्युमिनियम पासून बनविली गेली असून वजनाला अतिशय हलकी अशी ही बाईक सहज उचलून नेता येते.


या बाईकला ४६७ वॉटची इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे. रायडर ज्या वेगाने पेडल मारेल त्यानुसार मोटर किती पॉवर जनरेट करणार हे ठरते. रायडरने आरामात पेडल केले तर मोटर कमी पॉवर देते. या उलट रायडरला पुरेशा व्यायामाचा अनुभव हवा असेल तर जोरात पेडल करावे लागते. या बाईकची किंमत ५७९० पौंड म्हणजे ५.३७ लाख रुपये असून ग्राहकांना तिची डिलीव्हरी जून २०२० नंतर दिली जाणार आहे.

Leave a Comment