ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याने पिकविली सीडलेस, रसाळ लीची


रसाळ लीची हे अनेकांचे आवडते फळ आहे. लीची ज्यूस पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण लीची प्रेमीना लीचीमध्ये असलेली मोठी बी थोडी अडचणीची वाटते. बीच्या मानाने आतील गर् कमी असतो. ऑस्ट्रेलियातील एका शेतकऱ्याने या समस्येचे उत्तर शोधले असून त्यासाठी त्याने लीचीवर सतत २० वर्षे प्रयोग करून सीडलेस म्हणजे बिन बियाची लीची तयार केली आहे. तिब्बी डिक्सन असे या मेहनती शेतकऱ्याचे नाव असून तो ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्वीन्सलंड मधील सरीना बीच येथे शेती करतो.

तिब्बीला बिनबियाची लीची विकसित करायची होती आणि त्यासाठी त्याने सतत २० वर्षे विविध प्रयोग केले. त्यासाठी त्याला ५ हजार डॉलर्स म्हणजे साडेतीन लाख रुपये खर्च करावे लागले. त्याने प्रथम चीनी लीची झाडाचा वापर त्यासाठी केला. तिब्बी गेली अनेक वर्षे क्रॉस पोलीनेशनचा वापर करून शेती करतो आहे. लीची साठी त्याने हेच तंत्र वापरले. मात्र पूर्णपणे सीडलेस लीची तयार होण्यासाठी त्याला २० वर्षे वाट पहावी लागली. ही सीडलेस लीची रसदार आहेच पण तिचा स्वाद थोडा अननसासारखाही आहे.

लीचीचे क्रॉस पोलीनेशन पद्धतीने वाढविलेले झाड जेव्हा प्रथम फळले तेव्हा त्याला आलेल्या लीची मध्ये छोटी बी होती. तीब्बीने परत एकदा हीच प्रक्रिया केली, पुन्हा फळे धरण्याची वाट पहिली आणि या अश्या प्रयोगातून अखेर त्याला हवी तशी लीची तयार झाली. आता तो या वाणाची खूप झाडे तयार करणार असून त्यामुळे या झाडांची विक्री करता येणार आहे. तिब्बीचा पुढचा प्रयोग केवळ बिनबीची लीची इतकाच नाही तर त्याला आता आकाराने मोठ्या आणि अधिक रसदार लीचीची प्रतीक्षा आहे.

Leave a Comment