आगीतून नेत्याच्या फोटोऐवजी मुलांना वाचविले, महिला ठरणार दोषी


उत्तर कोरिया हा एक अजबगजब देश आहे. त्याचा नेता किम जोंग उन आणि तेथील विचित्र कायदे नेहमीच चर्चेत असतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे एका महिलेला तुरुंग वारी करण्याची पाळी येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी हे विचित्र कायदेच जबाबदार ठरणार आहेत.

डेली मेल मधील बातमीनुसार ऊ.कोरियाच्या हॅमग्योतील ऑनसोन कौंटी मध्ये एका घराला आग लागली. या घरात दोन कुटुंबे एकत्र राहत होती. मात्र आग लागली तेव्हा घरात फक्त मुले होती. घराला आग लागल्याचे समजताच मुलांचे पालक तातडीने घराकडे धावले आणि मुलांच्या आईने प्रथम मुलांना आगीतून बाहेर काढले. पण त्यावेळात घरात भिंतीवर लावलेले कोरियाच्या माजी नेत्यांचे म्हणजे इल संग आणि किं जोंग इल यांचे फोटो जळून गेले. मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीने या प्रकरणी तपास सुरु केला असून हा गुन्हा घडल्यामुळे या महिलेला तुरुंगवास होईल असे सांगितले जात आहे.

ऊ. कोरियात प्रत्येक घरात कोरियाच्या माजी नेत्यांचे फोटो लावणे बंधनकारक आहे. असे फोटो लावले गेले आहेत की नाही याची अचानक घरांना भेटी देऊन तपासणी केली जाते. या नेत्यांचा अपमान झाल्याचा संशय आला तरी तो गुन्हा मानला जातो आणि दोषीना कडक शिक्षा फर्मावली जाते. ज्या घराला आग लागली आणि या नेत्यांचे फोटो आगीत जळले त्या महिलेची मुले भाजल्याने रुग्णालयात दाखल आहेत मात्र त्यांची आई त्यांना भेटू शकत नाही असेही समजते. चौकशीत ती दोषी ठरली तर तिला दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागेल असेही समजते.

Leave a Comment