आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट अव्वल स्थानी कायम


नवी दिल्ली – आयसीसी टेस्ट रँकिंग फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसीने न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड या कसोटी सामन्यांच्या निकालानंतर ताजी यादी जाहीर केली आहे. भारताच्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला या यादीत फटका बसला आहे.

न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने द्विशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाने त्याच्या या खेळीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला. सामनावीराचा आणि मालिकाविराचा खिताब लाबूशेनला देण्यात आला. त्याला क्रमवारीतदेखील त्याच्या चांगल्या खेळीचा फायदा झाला. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत लाबूशेन दमदार भरारी घेत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. आता त्याच्या पुढे केवळ स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे दोन फलंदाज आहेत. सध्या ९२८ गुणांसह विराट कोहली अव्वल आहे, तर स्टीव्ह स्मिथ ९११ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला ताज्या यादीत फटका बसला आहे. एका स्थानाने पुजाराची घसरण होऊन तो ७९१ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे, तर दोन स्थानांनी अजिंक्य रहाणेची घसरण होऊन तो ७५९ गुणांसह नवव्या स्थानी पोहोचला आहे.

आयसीसी टेस्ट रँकिंगच्या गोलंदाजीच्या क्रमवारीत फारसा उलटफेर झालेला नाही. भारताचा जसप्रीत बुमराह सहाव्या, रविचंद्रन अश्विन नवव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानी कायम आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविंद्र जाडेजा दुसऱ्या स्थानी कायम आहे.

Leave a Comment