या अंतराळवीर कुत्र्यांची जगभरात होती चलती

अनेक दशकांपासून कुत्र्याला मानवाचा चांगला मित्र म्हटले जाते. मानवाच्या आतापर्यंतच्या अनेक यशात कुत्र्यांचे मोठे योगदान आहे. कुत्र्यांनीच मानवाची अंतराळात झेप घेण्यासाठी मोठी मदत केलेली आहे. याविषयी जाणून घेऊया.

दुसरे विश्वयुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हियत संघात शीतयुद्ध सुरू झाले. अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला होता. तर सोव्हियत संघाने अंतराळात अमेरिकेला मागे टाकण्यास सुरूवात केली. 3 नोव्हेंबर 1957 ला सोव्हियत संघाने स्पुतनिक 2 नावाचे अंतराळयान पाठवले. स्पुतनिक 1 च्या यशानंतर सोव्हियतचे नेते निकिता ख्रुश्चेव यांनी एक महिन्याच्या आत कुत्र्याला अंतराळयानासोबत पाठवण्याचे आदेश दिले होते.

Image Credited – Amarujala

लाइका नावाच्या कुत्रीला जेव्हा अंतराळयानात बसवण्यात आले, तेव्हा वैज्ञानिकांना माहित होते की, आपण तिला शेवटचे पाहत आहोत. जेव्हा स्पुतनिक 2 अंतराळात पोहचले तेव्हा सोव्हियतने याचा मोठा गाजावाजा केला व लाइका अंतराळात 7 दिवस राहिल्याचे सांगितले. मात्र 2002 मध्ये समोर आले की, अंतराळात पोहचल्यानंतर 7 तासांच्या आतच भिती आणि गरमीने तिचा मृत्यू झाला होता.

स्पुतनिक 2 मिशनच्या यशामुळे सोव्हियत संघाचा आंतरराष्ट्रीय स्तरावार मोठा दबदबा निर्माण झाला होता. लाइका संपुर्ण देशात हिरो झाली.

Image Credited – Amarujala

सोव्हियत संघ अंतराळ मिशनच्या सुरूवातीपासूनच कुत्र्यांना अंतराळात पाठवत असे. त्या काळात अमेरिकेचे वैज्ञानिक स्पेस मिशनसाठी माकड आणि चिंपाझीचा वापर करत असे. तर सोव्हियतचे वैज्ञानिक कुत्र्यांना पसंती देत. सोव्हियतचे वैज्ञानिक रात्रीच्या वेळी रस्त्यावरील कुत्री पकडत असे. त्यांना जेवण- ट्रेनिंग देऊन अंतराळ मिशनसाठी तयार केले जात असे. त्यांना नेहमी जोडीने पाठवले जाई. जेणेकरून वेगवेगळ्या प्राण्यांपासून मिळालेल्या आकड्यांची तुलना करता येईल.

Image Credited – Amarujala

स्पुतनिक 2 नंतर 3 वर्षांनी सोव्हियतच्या कुत्र्यांनी अंतराळात आणखी मोठी कामगिरी केली. 19 ऑगस्ट 1960 ला बेल्का आणि स्ट्रेइका नावाचे दोन कुत्रे, दोन उंदीर, एक ससा आणि काही मधमाशा अंतराळ प्रवासासाठी पाठवण्यात आल्या. सर्वांना स्पेससूट घालण्यात आला होता. आकड्यांनुसार, कक्षेत पोहचेपर्यंत दोन्ही कुत्रे शांत होते. चौथ्या चक्करमध्ये बेल्काला उल्टी झाली, यामुळे स्ट्रेइका देखील सतर्क झाली. रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, दोन्ही कुत्रे जास्त तणावात नव्हते.

Image Credited – Amarujala

अंतराळात पृथ्वीच्या 17 फेऱ्या मारल्यानंतर वैज्ञानिकांनी स्पेसक्राफ्टला परत बोलवले. पृथ्वीवर आल्यावर बेल्का आणि स्ट्रेइका मजेत होते. यानंतर तर सोव्हियत संघाचे हे अंतराळ प्रवासावरून परत आलेले दोन कुत्रे जगभरात प्रसिद्ध झाले. अनेक टिव्ही शोमध्ये गेले. अनेक देशांनी तर त्यांच्या नावावरून पोस्टाचे तिकिट आणि पोस्टर छापले.

Image Credited – Amarujala

जून 1961 ला जेव्हा सोव्हियत संघाचे नेते निकिता ख्रुश्चेव आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कॅनेडी यांच्यामध्ये व्हियना येथे शिखर वार्ता झाली. त्यावेळी कॅनेडी यांच्या पत्नी जॅकीने ख्रुश्चेव यांना अंतराळातून परतलेल्या स्ट्रेइकाची पिल्लं मागितली. ख्रुश्चेव यांनी स्ट्रेइकाचे पिल्लू पुशिन्काला अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या पत्नीला भेट दिले. पुशिन्का आणि व्हाइट हाउसमधील कुत्रे चार्लीला काही पिल्ल देखील झाली.

तज्ञ सांगतात की, पुशिन्का भेट म्हणून दिल्यानंतर सोव्हियत संघ आणि अमेरिकेतील तणाव खूप कमी झाला. 1963 ला कॅनेडी यांच्या हत्येनंतर पुशिन्काला व्हाइट हाउसच्या माळीला दान म्हणून देण्यात आले.

Leave a Comment