9 जानेवारीलाच का साजरा केला जातो ‘प्रवासी भारतीय दिवस’ ?

मागील 17 वर्षांपासून दरवर्षी ‘प्रवासी भारतीय दिन’ 9 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे. या दिवसाची खास गोष्ट म्हणजे भारताबरोबरच परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील या दिवसाची खास वाट पाहत असतात. कारण बाहेर राहून देखील हे लोक देशाचे नाव उज्जवल करू शकतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून मायदेशात परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून 2003 पासून दरवर्षी 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येत आहे. याच दिवशी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परतले होते.

महात्मा गांधी जेव्हा 1893 ला दक्षिण आफ्रिकेच्या नटाल प्रांतात पोहचले, तेव्हा तेथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. महात्मा गांधी हे यावेळी गप्प न बसता त्यांनी याविषयी आवाज उठवला. गांधीजींना यात यश देखील आले. अखेर 22 वर्षानंतर ते 9 जानेवारी 1915 ला भारतात परतले. याच दिनानिमित्ताने 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो.

आतापर्यंत देशातील अनेक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला आहे. 2003 साली सर्वात प्रथम प्रवासी भारतीय दिवस हा नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता. तर 2019 मध्ये हा दिवस काशी येथे साजरा करण्यात आला होता. 2016 मध्ये काही कारणास्तव या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा असतो की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. जगभरातील भारतीय प्रवाशांचे नेटवर्क तयार करणे व गुंतवणूक वाढवणे.

Leave a Comment