चिमुरडीच्या उपचारासाठी चक्क गायीच्या नसांचा वापर - Majha Paper

चिमुरडीच्या उपचारासाठी चक्क गायीच्या नसांचा वापर

दिल्लीच्या जवळील गुरूग्राम येथील एका हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली अशी सर्जरी करण्यात आली ज्यात लिव्हर ट्रांसप्लांट (यकृत प्रत्यारोपण) करण्यासाठी गायीच्या नसांचा वापर करण्यात आला आहे. हे लिव्हर ट्रांसप्लांट सौदी अरेबियाच्या एका चिमुकलीचे करण्यात आले. 14 तास चाललेल्या या सर्जरीनंतर आता चिमुकली एकदम व्यवस्थित असून, तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात देखील आले आहे.

सौदी अरेबियाची एक वर्षीय चिमूरडी हूरचे भारतीय डॉक्टरांनी लिव्हर ट्रांसप्लांट केले. आर्टेमिस हॉस्पिटलचे वरिष्ठ कंसलटेंट डॉ. गिरिराज बोरा यांनी सांगितले की, हे जगातील एकमेव असे यशस्वी ऑपरेशन आहे, ज्यात लिव्हरपर्यंत रक्त पोहचवण्यासाठी गायीच्या नसांचा वापर करण्यात आला.

हूरच्या पित्त नलिका विकसित न झाल्याने तिला लिव्हर समस्या उत्पन्न झाली. त्यानंतर सौदीच्या डॉक्टरांनी तिची सर्जरी भारतात करण्याचा सल्ला दिला.

एवढ्या लहान मुलीचे लिव्हर ट्रांसप्लांट करण्याची दिल्ली-एनसीआरमधील पहिलीच घटना असेल. तर जगातील पहिले असे लिव्हर प्लांट असेल, ज्यात गायीच्या नसांचा वापर करण्यात आला आहे. गायीच्या नसांना परदेशातून मागवण्यात आले होते.

चिमुरडीचे लिव्हर ट्रांसप्लांट यशस्वी झाल्यानंतर 2 आठवड्यांनी तिला सोडण्यात आले. मुलीचे वडील अहमद यांनी भारत आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आभार मानले.

Leave a Comment