मागील काही दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी तेजीने वाढत आहे. अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक कार्स आणि एसयूव्ही लाँच करत आहेत. यातच आता चंदीगढ येथील भारतीय स्टार्टअप कंपनी झॅड ऑटोमोटिव्हने सायकलसारखी ई-बाईक तयार केली आहे. ही ई-बाईक संपुर्णपणे इलेक्ट्रिक असून, पर्यावरण पुरक आहे.
या स्टार्टअप कंपनीने युटिलिटी मिनी (Utility Mini) आणि झॅड एक्स1 (Zadd X1) या दोन ई-बाईक तयार केल्या आहेत. यातील युटिलिटी मिनी ही बाईक यावर्षी एप्रिलमध्ये बाजारात दाखल होणार आहे, तर झॅड एक्स1 बाईक यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच होईल.

द बेटर इंडियाच्या वृत्तानुसार, या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे या बाईक्स इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे सहज स्मार्ट बाईक्समध्ये बदलू शकतात. कॉम्पॅक्ट साईज युटिलिटी मिनीमध्ये दोन रिमोव्हेबल बॅटरीझ आहेत. ज्या 2 तासात फुल चार्ज होतात. सिंगल चार्जमध्ये ही ई-बाईक 120 किमी अंतर पार करू शकते. याशिवाय चालकाच्या वजनाव्यतरिक्त 80 किलो वजनाचे सामान यावरून नेता येऊ शकते.
ड्युअल बॅटरी पॅकसह या ई-बाईकची किंमत 50 हजार रुपये आणि सिंगल बॅटरी पॅकसह याची किंमत 40 हजार रुपये आहे. त्यांना या बाईकसाठी आतापर्यंत 200 प्री-ऑर्डर देखील आल्या आहेत.

या व्यतरिक्त झॅड एक्स1 बाईक ग्रामीण भागातील लोकांना लक्षात घेऊन बनविण्यात आली आहे. या बाईकमध्ये पुढील बाजूला बास्केट आणि बॅग्स देखील मिळेल. यामध्ये कनेक्टेड बाईकिंग सिस्टम मिळेल, जे अॅपद्वारे मॉनिटर करता येईल.
कंपनीला उद्योग ते ग्राहक अशा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून मोठी ऑर्डर येत आहे. याशिवाय ग्राहकाने ही बाईक वापरल्यानंतर प्रत्येक वेळेस ई-बाईकच्या स्थितीविषयी अॅपद्वारे रिपोर्ट मिळण्याची देखील सोय आहे.

या बाईकची निर्मिती लुधियाना येथे करण्यात येत असून, डिझाईन, मार्केटिंग, विक्री आणि इतर काम पंचकुला, हरियाणा येथून होत आहेत. भारतासह फिनलँड, नॉर्वे, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये देखील कंपनीचे डिलर्स आहेत. याशिवाय कंपनीने मुंबई, बंगळुरू, चंदीगढ, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांमध्ये ई-बाईक रिटेलर्सचे नेटवर्क देखील निर्माण केले आहे.
या स्टार्टअपची सुरूवात इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असलेले शुभम गोयल आणि अनिकेत भारद्वाज या मित्रांनी केली असून, दोघेही सध्या चितकारा यूनिवर्सिटीमध्ये पुढील शिक्षण घेत आहेत.