साक्षी महाराजांची दीपिका पादुकोणवर आगपाखड


नवी दिल्ली – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजप खासदार साक्षी महाराज हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. तुकडे तुकडे गँगची दीपिका पादुकोण ही सदस्य असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मंगळवारी जेएनयूमध्ये हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात पोहोचली होती. त्यावरून दीपिकावर त्यांनी टीका केली.

उन्नावचे खासदार असलेले साक्षी महाराज यांना एका मुलाखतीमध्ये दीपिकाच्या जेएनयू भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दीपिका पादूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य असून या सर्वांमागे काही परदेशी शक्तींचा पाठींबा असल्याचे साक्षी महाराज म्हणाले.

दीपिका जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी झाली होती. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेट घेत विचारपूस केली. मात्र, यावेळी दीपिकाने कोणतेही भाषण किंवा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. दीपिका पूर्णवेळ शांत उभी होती.

Leave a Comment