यंदाचा माघमेळ्यात दिसणार नाहीत भिकारी


उद्यापासून म्हणजे १० जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या वार्षिक माघमेळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून ४३ दिवस हा मेळा सुरु राहणार आहे. तीर्थयात्री सुरक्षेला यंदा सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहेच पण त्याचबरोबर हा मेळा इको फ्रेंडली होईल अशी काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे या मेळ्यात एकाही भिकारी दिसणार नाही अशी काळजी घेतली गेली असून त्यासाठी खास पोलीस दले तैनात केली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मेळ्यात अनेक ठिकाणहून जसे यात्रेकरू येतात तसेच भिकारीही मोठ्या प्रमाणावर येतात. येथे येण्यासाठी कुणालाही प्रवेश बंदी नसते. भिकारी यात्रेकरूना उपद्रव देतात पण अनेकदा समाजकंटक भिकाऱ्याच्या वेशात येऊन उपद्रव माजवितात. काही वेळा दहशतवादी भिकारी वेशात येतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी १२०० पोलिसांचे दल ओळखपत्र तपासणी साठी तैनात केले गेले आहे. तीन विशेष टीम त्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत.

या यात्रेत प्लास्टिक बंदी आणि थर्मोकोल बंदी केली गेली असून मेळ्यात येणाऱ्या सर्व आखाड्याना या वस्तूंचा वापर करू नये अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत. चहासाठी कुल्हड वापरले जाणार आहेत. सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले आहेत. दरवर्षी भरणाऱ्या या मेळ्यात देशभरातून लाखो भाविक सामील होतात. यंदा या मेळ्यातील मुख्य स्नाने १० जानेवारी पासून सुरु होत असून १५, २४, ३० जानेवारी आणि ९ व २१ फेब्रुवारी रोजी विशेष स्नाने मुहूर्त आहेत.

Leave a Comment