छोट्याश्या सेफ्टीपिनचे मोठे उपयोग


बटन तुटले, कपडा उसवला, साडी पिनअप करायची आहे तर चटकन वापरली जाते ती सेफ्टीपिन. दिसायला अगदी छोटीशी अशी ही वस्तू अनेक प्रकारे उपयोगात येते. घरोघरी तिचा वापर होत असतो आणि महिला वर्ग खास करून सेफ्टीपिनच्या अगदी प्रेमात असतो. बहुतेक सर्व महिला हातातल्या बांगडीत, गळ्यातल्या माळेत एखादीतरी सेफ्टी पिन अडकवितातच, अगदीच काही नाही तर महिलांच्या पर्स मध्ये ही पिन सापडणारच याची खात्रीच असते.

या सेफ्टीपिन विषयी काही मजेदार माहिती येथे देत आहोत. या सेफ्टीपिनचा शोध १८४९ मध्ये वॉल्टर याने लावल्याचे मानले जाते. त्याने ८ इंची तांब्याच्या तारेपासून ही पिन बनविली होती. या पहिल्या पिनचे टोक अडकविण्यासाठी एक बक्कल होते. याच वॉल्टरने शिलाई मशीन, ट्रामची घंटी, स्पिनर व रस्ते साफ करण्याच्या मशीनचा शोध लावला आहे.

वॉल्टरने प्रथम ही पिन डब्ल्यू आर अँड कंपनीला विकली आणि या कंपनीने त्याला अश्या पिन बनविण्याची मोठी ऑर्डर दिली. त्यातून वॉल्टरने अफाट पैसा मिळविला. आता पूर्वीच्या या पिनेत काळानुसार काही बदल झाले आहेत. पण आजही तिचे उपयोग मात्र अबाधित आहेत. केवळ उसवलेला कपडा किंवा बटन तुटले तरच नाही तर पायात काटा मोडला, कान खाजू लागला तरी या पिनेचा वापर करताना आपण अनेकांना पाहतो. महिलांना ही पिन चटकन प्रतिकाराचे साधन म्हणून ही जवळची वाटते.

Leave a Comment