जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत केके आणि पीकेंचा समावेश


जगातील सर्वात प्रभावशाली 20 लोकांची यादी प्रख्यात मासिक फोर्ब्सने प्रसिद्ध केली असून हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक पक्षाचे ज्येष्ठ नेते दुष्यंत चौटाला यांनीही या यादीमध्ये आपली ताकद दाखवली आहे. दुष्यंत या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, दुष्यंत चौटाला जगभरात एक आशावादी आणि उत्साही व्यक्ती म्हणून समोर आले आहे.

राजकारणात प्रवेश करून दुष्यंत चौटाला हे भारतीय इतिहासातील सर्वात तरुण खासदार झाले आणि आता ते हरियाणाचे उपमुख्यमंत्री आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांचेही फोर्ब्सच्या या यादीमध्ये नाव आहे.

कन्हैयाला जगातील सर्वात प्रभावशाली 20 लोकांमध्ये फोर्ब्सने 12 वे स्थान दिले असून, 16 व्या क्रमांकावर प्रशांत किशोर आहेत. भारतीय राजकारणाच्या भविष्यात कन्हैया आपली मजबूत ओळख निर्माण करू शकतो, असे फोर्ब्सने आपल्या मासिकात म्हटले आहे. त्याचबरोबर प्रशांत किशोर यांची राजकारणाच्या क्षेत्रात भूमिकाही वाढणार असल्याचे सांगितले गेले आहे. या मासिकाने राजकीय भाष्यकार आणि विनोदकार हसन मिन्हाज यांना प्रथम स्थान दिले आहे.

याशिवाय या यादीत भारतीय वंशाचे युरोप निवासी आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सीएफओ आदित्य मित्तल, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा, थायलंडची राजधानी बँकॉकमधील इंडियन वंशाच्या शेफ गरिमा अरोरा यांचा समावेश आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, पर्यावरणीय कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, फिनलँडचे नवे पंतप्रधान सना मारिन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

Leave a Comment