शिक्कामोर्तब ! पवन जल्लाद फासावर लटकवणार निर्भयाच्या नराधमांना


मेरठ – 22 येत्या जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्यात येईल. मंगळवारी त्या चौघांचे दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले आहे. उत्तर प्रदेशच्या तुरुंग पोलिस महासंचालकांना तिहार तुरुंग प्रशासनाने पत्र लिहून जल्लादला तयार करण्याची मागणी केली आहे. त्यावर उत्तर प्रदेश सरकारने शिक्कामोर्तब करत मेरठचे पवन जल्लाद हे त्या चार नराधमांना फाशी देणार हे स्पष्ट झाले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना पवन यांनी म्हटले की, मी पाच मुलींचा पिता आहे. त्या नराधमांना फाशी देऊन मला आणि निर्भयाच्या कुटुंबीयांना आनंदच होईल. यामुळे समाजात अशाप्रकारचे गुन्हे न करण्याचा संदेशही जाईल. पवन पुढे म्हणाले की, निर्भयाच्या चारही दोषींना माझ्याहातून फाशी देण्याची माहिती मलाही मिळाली आहे. जर मला बोलवण्यात आले तर मी तयार आहे. चौघांना फाशी देण्याची हिम्मत माझ्यात आहे. मला सरकारी आदेश मिळाल्यावर मी लगेच दिल्लीला रवाना होईल.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे जेल राज्यमंत्री जय कुमार सिंह म्हणाले की, निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी मेरठमधील पवन कुमार यांची सेवा घेण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने पत्र लिहिले होते. मेरठ कारागृह प्रशासनाला दोषींच्या फाशीचा दिवस निश्चित झाल्यानंतर या कामासाठी फाशी देणारा पवन यांना पाठविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जल्लाद पवन म्हणाले की, ज्या कैद्याला फाशी द्यायची असते, त्याला फाशी देण्याच्या जागी अर्ध्या तासापूर्वी आणले जाते. तख्त्यावर चढवल्यानंतर त्याचे हात आणि पाय बांधले जातात. त्यानंतर जल्लाद काळा कपडा तोंडावर टाकून फास दिला जातो आणि ठरलेल्या वेळेवर कैद्याला फाशी दिली जाते.

Leave a Comment