दबंग 3च्या सहकलाकाराला सलमान खानचे महागडे गिफ्ट


सिनेसृष्टीतील अन्य सेलेब्रिटींसोबत सलमान खानचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. आपल्या सह-कलाकार आणि मित्रांना सलमान भेटवस्तूही देत असतो. पण या बाबतीत दबंग 3 मधील खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता किच्चा सुदीप खूपच लकी ठरला आहे. कारण, त्याला एकाच वेळी सलमानने दोन खास आणि मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत. साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपच्या घरी नुकताच सलमान खान गेला होता. सलमानने यावेळी त्याला नवीन बीएमडब्ल्यू एम 5 कार गिफ्ट केली आहे.


किच्चा या भेटवस्तूमुळे खूपच खूश झाला होता. त्याने सलमान आणि कारसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, आपण जेव्हा चांगले करतो तेव्हा नेहमीच चांगले होते. पुन्हा एकदा माझ्य़ावर सलमान खान सरांनी विश्वास टाकला आहे आणि मला हे विशेष गिफ्ट दिले आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटूंबियांबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आपण माझ्या घरी आलात याचा मला आनंद झाला.


सलमानने यापूर्वी सुदीपला एक खास जॅकेट गिफ्ट केले होते. सलमानच्या आवडत्या कुत्र्याचे या जॅकेटच्या मागील बाजूस चित्र होते. हे फोटो किच्चाने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात हे जॅकेट घालून तो दिसत आहे आणि सलमान या जॅकेटवर छापलेल्या कुत्र्याला किस करताना दिसत होता. हे फोटो चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल झाले होते.

Leave a Comment