इराणचा अमेरिकी लष्करी तळावर रॉकेट हल्ला


बगदाद – अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात महत्त्वाचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला ठार केल्यानंतर इराणचा पुरता तीळपापड झाला आहे. अमेरिकेच्या इराकमधील अल-अस्साद या लष्करी तळावर इराणने पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. इराणने काल (मंगळवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली.

क्षेपणास्त्र सोडतानाचा व्हिडिओ इराणची निम-अधिकृत वृत्तसंस्था फार्स न्यूज एजन्सीने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. याला त्यांनी इराणच्या सूडाची सुरुवात; अमेरिकेच्या अल-अस्साद येथील लष्करी तळावर इराणी क्षेपणास्त्रे हल्ला करतानाचा क्षण, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. इराणच्या हल्ल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

या घटनेच्या बातमीला अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे सहायक जॉनथन हॉफमन यांनी दुजोरा दिला आहे. इराणने मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहा ते बारा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर डागल्या, अशी माहिती त्यांनी दिली. ‘शहीद सुलेमानी’ असे नाव इराणने या हल्ल्याच्या मोहिमेला दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कुर्दिश स्वायत्त प्रदेशातील इरबील या तळावरही इराणने हल्ला केल्याच्या वृत्ताला अमेरिकेने दुजोरा दिला आहे. मंगळवारी इराणने कासिम सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केले.

Leave a Comment