मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश?


मुंबई – राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली असून मुंबईत मनसेचे पहिले महाअधिवेशन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारीला होणार आहे. अमित ठाकरे या अधिवेशनात यापुढे राजकारणातील सक्रिय होणार असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘मनसे’च्या या अधिवेशनाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता राज ठाकरे राजकीय भूमिका बदलण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात काल पार पडलेल्या राज आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात मनसे आणि भाजप असे समीकरण राज्याच्या राजाकारणात पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना ‘राज’पुत्राच्या राजकारणातील एण्ट्रीने पक्षाला नवचैतन्य आणि युवा नेतृत्त्व देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

याआधी मनसेच्या काही आंदोलनात अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. मनसेने नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा काढला होता. अमित ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले होते. तर रेल्वे आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. पण, त्यांनी व्यासपीठावरुन सक्रियपणे भाषण केलेले नाही. आता २३ जानेवारीच्या पक्षाच्या अधिवेशनात अमित ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment